एका प्रवासाची सांगता
त्याला वाटलं, "वा: किती सुंदर!”
एका मोठ्या शिळेला टेकून ती बसली होती.
त्या अंतरावरून त्याला दिसले ते फक्त तिचे
भडक रंगाचे कपडे आणि त्या काळ्या फत्तरावर
विसावलेलं तिचं कोमल शरीर. तेवढंच पुरे
होतं. त्याच्या सकाळच्या भटकंतीला त्या
दृश्यानं एकदम अर्थ प्राप्त करून दिला होता.
सकाळभर त्या भग्न अवशेषांमधून तो
हिंडत होता. प्रथम त्या सगळ्याचा
प्रचंड आवाका पाहून तो स्तिमित झाला.
पण हळुहळू त्या काळ्या शिळांचं त्याच्यावर
दडपण यायला लागलं. जराशा अंतरावर
उभं राहिलं, की नैसर्गिक फत्तर कुठला
आणि माणसाने निर्माण केलेली वास्तू
कुठली हे कळेनासं होई. मग त्याला
आपण एखाद्या विज्ञानकथेतल्या
काल्पनिक प्रदेशात वावरत
असल्यासारखं वाटायला लागलं. सहाशे
वर्षांपूर्वी इथे हाडामासाची माणसं आपलं
जीवन व्यतीत करीत होती. हे एक
भरभराटीला आलेलं संपन्न राज्य होतं. आता
इथे फक्त पुरातत्व खात्याने लावलेल्या
पाट्या आहेत. हजारो लोक पायपीट करून