पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मित्र नाही का? तुला उशीर झाला होता, मलाही एकटीला कंटाळा आला होता. त्याच्यासमोर झोपता तर येत नाही ना? मग गप्पा मारल्या म्हणून काय झालं? काही तरी काढून का चिडतोयस? चल, उशीर झालाय, तू दमला असशील. जेवून घेऊ या."
 "मला भूक नाही."
 काही दिवस तिनं त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. एकदा कळवळून ती त्याला म्हणाली, "का तू असा मला छळतोयस? मला नाही ते सहन होत. मारून तरी टाक मला. मग तूही सुटशील नि मीही सुटेन."
 "माझं दुसरं काही म्हणणं नाही. फक्त तू मला खरं सांग."
 "खरंच सांगतेय रे. हे कसलं भूत तुझ्या डोक्यात बसलंय!"
 एक दिवस तो तिला म्हणाला, "माझ्या मित्रानं मला एकाकडे नेलं होतं त्याला संमोहनविद्या माहीत आहे. तू त्याच्याकडे येशील?"
 "कशाला?"
 "संमोहनाच्या अमलाखाली लोक खरं बोलतात म्हणे!"
 ती रडायला लागली.
 "रडायला काय झालं?"
 "मी इतकं जीव तोडून सांगते त्याच्यावर तुझा विश्वास बसत नाही. काहीतरी मंत्रतंत्र करण्यात काय अर्थ आहे? नाही तरी आता तुझ्या-माझ्या एकत्र राहण्याला काही अर्थच उरला नाही! मी इथून जाते, त्याशिवाय ह्या सगळ्याला अंत नाही."
 "असं म्हणू नकोस. माझं तुझ्यावर फार प्रेम आहे ग. माझ्या वागण्याचा तुला त्रास होतो हे मला दिसतंय. पण मी तरी काय करू! माझ्या मनात येणारे विचार मी थांबवू शकत नाही."
 "मी तुझ्या आयुष्यातनं निघूनच गेले म्हणजे ते विचार आपोआपच थांबतील. मग मी काय करतेय, कुठे जातेय, कुणाला भेटतेय ह्याला महत्त्वच राहणार नाही."
 तो एकदम रडायला लागला. गदगदून, हुंदके देऊन रडायला लागला."असं करू नकोस. एवढा एक चान्स दे मला."
 तिनं त्याला कधीच रडताना पहिलं नव्हतं. नुसते डोळ्यांतून झरझर अश्रू वाहण्यापेक्षा त्याचं रडणं भयानक होतं. ते आतून पिळवटून निघत होतं. तिला ते बघवेना. शेवटी ती म्हणाली. "हा कोण माणूस आहे, त्याच्यासमोर

कमळाची पानं । १३४