Jump to content

पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "कुणावर छाप पाडायला वेळ कुठे असतो गिऱ्हाईकांची गर्दी सुरू झाली म्हणजे?"
 "गर्दी काही सगळाच वेळ नसते. कधीतरी मोकळा वेळ मिळत असेलच की! तेव्हा काय करतेस?"
 "गप्पा मारते."
 "कुणाशी?"
 "इतर तिथं काम करतात ना, त्यांच्याशी. बहुतेक सगळ्या बायकाच आहेत, पण पाच-सहा पुरुषसुद्धा आहेत. सिद्धार्थ, तू असं का नाही करीत? एक दिवस तू तिथं येऊन बस. म्हणजे दिवसभर मी नेमकं काय काय करते, कुणाशी बोलते, कुणावर छाप पाडते ते तुला कळेल!"
 "रागावू नकोस, मनीषा. कधी कधी मला काय होतं तेच कळत नाही. मला भीती वाटते. तू बाहेरच्या जगात जातेस, तुला माझ्यापेक्षा देखणे, सरस असे कितीतरी पुरुष भेटत असतील."
 "असतील! पण म्हणून मी लगेच त्यांच्या प्रेमात पडणार असं तुला कसं वाटतं? एवढा विश्वास नाही तुझा माझ्यावर?"
 "क्षमा कर मला."
 पण पुन्हा तो मूळपदावर यायचा. एखाद्या दिवशी तिला घरी यायला उशीर झाला की तो लगेच विचारायचा, "कुठं गेली होतीस का वाटेत? इतका उशीर?" मग जरासं दरडावून विचारायला लागला, "कुठं गेली होतीस?"
 ती शक्यतोवर गप्प बसत असे. पण एक दिवस चिडून म्हणाली, "कुठं जाणार? तेवढं त्राण तरी असायला हवं ना अंगात? माझ्या पोटात आपलं मूल आहे, सिद्धार्थ. त्याचा तरी विचार कर तू मला वाटेल तसं बोलतोस तेव्हा. दिवसभर काम करून माझी पाठ दुखते, अंग दुखतं, जीव उबून जातो नुसता. कधी एकदा घरी येते असं होतं मला आणि घरी आलं की तुझ्याकडून हे असं ऐकून घ्यायचं."
 बाळंतपण दोनेक आठवड्यांवर आल्यावर तिनं नोकरी सोडली. बाळंतपणाला माहेरी जाण्याचा प्रश्न नव्हता. तिनं आईबापांच्या इच्छेविरूद्ध लग्न केलं होतं. म्हणजे तसं तू आम्हाला मेलीस आम्ही तुला मेलो असा प्रकार नव्हता. पण जातीबाहेर, ते सुद्धा असल्या नगण्य माणसाशी, लग्न केल्याबद्दल ते नाराज होते. त्यांना सिद्धार्थाबद्दल एकूण तुच्छताच वाटते आणि ते त्याला कधीच स्वीकारणार नाहीत हे माहीत असल्यामळे लग्न झाल्यापासून मनीषानं त्यांच्याशी

कमळाची पानं । १३२