पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्याच्या कामातही ती त्याला मदत करायची. त्यांच्या वस्तीत शाळेत न जाणारी पुष्कळ मुलं होती. त्यांना जमवून अक्षरओळख करून द्यायची, स्वच्छता शिकवायची, गाणी म्हणून घ्यायची अशी अनौपचारिक शाळा सिद्धार्थ एका ट्रस्टतर्फे चालवायचा. शाळेच्याच जागेत संध्याकाळी तो एक वाचनालय चालवायचा. रोजची वर्तमानपत्रं, काही मासिकं, थोडीफार पुस्तकं एवढंच ठवलेलं असे. वस्तीतील तरुण मुलं जमायची, कधी वाचन, कधी चर्चा व्हायच्या. कुणी आपले व्यक्तिगत प्रश्न घेऊनही यायचं.
 मनीषाला ह्या कामात मदत करायला मनापासून आवडलं. काहीतरी उपयोगी, चांगलं काम केल्याचं समाधान तिला मिळत होतं. तिला वाटलं इतके दिवस आपण कसल्या लुटुपुटीच्या जगात राहात होतो.
 ट्रस्टकडून सिद्धार्थाला पगार मिळायचा. पगार जेमतेमच होता, पण त्याच्या किंवा मनीषाच्या सवयी खर्चिक नव्हत्या. त्यांना चैनीच्या आयुष्याची अपेक्षा नव्हती. तरी पण हळूहळू मनीषाला वाटायला लागलं की थोडे जास्त पैसे मिळवायला हवेत. कमीत कमी म्हटलं तरी आणखी थोड्या वस्तू, भांडी-कुंडी घ्यायला हवीत. मुलं झाली म्हणजे थोडी मोठी जागा घ्यावी लागेल. शिवाय त्यांचं खाणंपिणं, कपडे, शिक्षण. आधी सिद्धार्थाचा पगार अपुरा,त्यातनं कुणाची नड असली की तो चटकन पैसे काढून देणार. मग भागायचं कसं? तिनं सिद्धार्थाबरोबर विचारविनिमय करून नोकरी करायचं ठरवलं. आता मागं वळून बघताना त्यांच्यातल्या बेबनावाची सुरुवात तिथपासूनच झाली असं तिला वाटलं. तसं तिनं नोकरी करू नये असं त्यानं कधी दर्शवलं नाही, पण त्याला काहीतरी खुपतंय असं तिला जाणवत राहिलं. तिची नोकरी होती एका मोठ्या दुकानात कॅशिअर म्हणून. लोक ज्या वस्तू घेऊन येतील त्यांचं कॅश रजिस्टरवर बिल करायचं. पैसे घ्यायचे, मोड द्यायची एवढं काय. ती कामावर निघाली की तिचे जरा चांगलेचुंगले कपडे, नीटनेटके केस ह्यांची सिद्धार्थ सुरुवातीला चेष्टा करायचा. "हो, घरी काय कसंही केस पिंजारून पारोशा साडीत सकाळभर बसलं तरी आम्हाला चालतं. आम्ही काय डिपार्टमेंट स्टोअरमधलं गिऱ्हाईक थोडंच आहोत?"
 चेष्टेचं गंभीर आरोपात, दुखावणाऱ्या टोमण्यांत नक्की कधी रूपांतर झालं मनीषाला कळलंच नाही.
 "अलिकडे फारच नखरा चाललेला असतो! कुणावर एवढी छाप पाडायची असते तिथे?"

कमळाची पानं । १३१