होता, पण त्याही पेक्षा नंतरच्या चर्चेत त्याचं वेगळेपण दिसून आलं. चर्चासत्रानंतर मनीषा त्याच्याशी बोलली होती आणि तिला त्याचं म्हणण पटत गेलं होतं.
ज्योती म्हणाला त्याप्रमाणं ती बदलली होतीच, पण हा बदल नुसता एकदा सिद्धार्थाला भेटून झालेला नव्हता. आधीपासून होतच होता, फक्त सिद्धार्थाच्या भेटीनं त्याला नेमकी दिशा दिली. कदाचित 'मी लग्नच करणार नाही' ह्या अवस्थेसारखी क्रांतीची, विद्रोहाची हाक हीही एक प्रगल्भतेकडे पोचण्याची आधीची अवस्था असेल किंवा ज्योतिर्मय म्हणाला त्याप्रमाणं, प्रस्थापित समाजाची लग्न, घर-संसार, मुलं-बाळं ही मूल्यं स्वीकारली की विद्रोहाची भाषा सोडून द्यावी लागते.
त्यांचा संसार सिद्धार्थाच्या छोट्याशा भाड्याच्या खोलीत सुरू झाला. त्याची आई एकटीच वेगळी राहायची. ती फार तऱ्हेवाईक होती आणि तिचं कुणाशीच पटत नसे. कुणी म्हणे तिचा दुसऱ्या कुणाशी संबंध होता म्हणून तिला एकटं राहायचं होतं. सिद्धार्थाचा बाप तो जन्मायच्या आधीच घर सोडून गेला होता. तो कुठं आहे ते त्याला माहीत नव्हतं. त्यानं बापाला कधी पाहिलं नव्हतं, आणि त्याच्याबद्दल त्याला फारसं कुतूहलसुद्धा वाटत नसे. त्याला एक थोरला भाऊ होता, पण त्याच्याशीही त्याचा फारसा संबंध नव्हता, आणि त्या दोघांचा बाप एकच होता की काय हेही त्याला नक्की माहीत नव्हतं.
हे सगळं त्यानं मनीषाला सांगितलं होतं, म्हटलं होतं, "माझ्यासारख्या आगापिछा नसलेल्या माणसाशी लग्न करायचं की नाही ते नीट विचार करून ठरव."
आपल्या आयुष्यात ध्यानीमनी नसलेलं घडतंय ह्याच्यावर सिद्धार्थाचा विश्वास बसत नव्हता. मध्येच तो विचारायचा, "मनीषा, मी स्वप्नात आहे का?"
ती त्याला चिमटा काढायची आणि त्यानं स् केलं की म्हणायची, "आहे ना खरं?"
तो म्हणायचा,"मला फार भीती वाटते की मी डोळे उघडीन आणि तू माझ्या आयुष्यातून नाहीशी झालेली असशील"
"आता मी तुला जन्मभर चिकटलेय. तू हाकललंस तरी मी तुला सोडून जाणार नाही."
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/130
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १३०