पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/125

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्या गुबगुबीत संसाराला जपत जगायला लागले तर हुकुमशहांना फारच आनंद होईल."
 उजव्या पायाचा चवडा जमिनीवर मागेपुढे घासत होता- आपल्याच स्वतंत्र बुद्धीने हलत असल्यासारखा, त्याच्याकडे रागिणी बघत होती. तिला वाटलं, आपलं डोकं जोरानं आपटलंय. ही बधिरता गेली की संवेदना हळूहळू परत येईल बहुतेक.
 धरमला वाटलं, जाऊन तिला आपल्या मिठीत घ्यावं. म्हणावं, की हे एक दुःस्वप्न होतं, ते विसरून जा. ते पडण्यापूर्वी आपण जिथं होतो तिथं परत जाऊ या. पण त्याला तिच्या जवळ जाण्याचा, तिला स्पर्श करण्याचा धीर झाला नाही.
 बऱ्याच वेळाने त्याने फक्त तिला हलकेच हाक मारली, “रागिणी-". तिनं मान उचलून वर पाहिलं. विक्रम आणि शमा खोलीत नाहीत हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. मग ती धरमकडे पाहून मंद हसली नि म्हणाली, "त्याच असं आहे धरम, कधी फासे उलटे पण पडतात. जो जुगार खेळतो त्याला ही शक्यता धरून चालावंच लागतं."

स्त्री नोव्हेंबर १९८३


कमळाची पानं । १२५