त्याला वाटलं, तिनं आपल्याला म्हणावं, धरम, मला भीती वाटते रे. मग आपण तिला जे घडणारं आहे त्याची अटळता, तिच्या धडपडीची निष्फळता पटवून देऊ. पण ती काही बोलली नाही. त्याच्या मनात आलं, ह्या मुलांचं जे व्हायचंय ते त्यांनी स्वत:च्या हाताने ओढवून घेतलेलं असणार आहे. फक्त त्यांनी आपल्याला गोत्यात आणलं नाही म्हणजे मिळवली.
कोपऱ्यावरनं दोन सायकली वळल्या आणि रागिणीने सोडलेल्या नि:श्वासाबरोबर तिचं ताठरलेलं अंग एकदम सैलावलं. मुलं फाटकाशी पोचली तोवर "किती रे हा उशीर!" असे सवयीने ओठापर्यंत आलेले शब्द परतवून ती म्हणाली, "दिवे नाहीच ना घेतलेत अजून?"
शमा हसत म्हणाली, "रस्त्यावरच्या दिव्यांचा उजेड पुरेसा असतो ग."
"कायदा तसं मानत नाही. एक दिवस पोलिसानं पकडलं म्हणजे समजेल."
"कोणी नाही पकडत. सगळे असेच बिनदिव्याचे जातात."
"बरं, चला आता लवकर. हातपाय धुऊन जेवायलाच या लगेच."
मुलांनी पानं घेतली. पाणी वाढलं. जेवण टेबलावर आणून वाढलं. रागिणीच्या मनात अनेकदा येई तसं आलं, ही किती चांगली वागतात. अति चांगली? परक्यासारखी? कदाचित माझी मुलं असती तर घरी आल्यावर पुस्तकं अस्ताव्यस्त फेकून आयती टेबलाशी येऊन बसली असती, कामाला बोट लावल नसतं. माझ्याकडून सतरांदा ओरडून घेतलं असतं.
विक्रम आणि शमा भुकेनं, मनापासून जेवत होती. एकदा विक्रम म्हणाला ,"आमची आई म्हणायची की अन्न समोर असलं की पोटभर खाऊन घ्यावं. पुढलं जेवण कधी कठे मिळेल कुणाला माहीत.
रागिणीला वाटलं. इतकी वर्ष माझ्या घरी राहूनही त्यांना भविष्यकाळाबद्दल इतकी असुरक्षितता वाटते?
जेवणं झाल्यावर बैठकीच्या खोलीत गप्पा मारता मारता शमा टेबलावरच्या मासिकांशी चाळा करीत होती. तेव्हा तिला पत्र सापडलं.
"आईचं पत्र! कधी आलं?" ती म्हणाली.
"अरे हो," रागिणी म्हणाली. "मी विसरलेच होते. आजच आलं. मी तिथे आवराआवर करताना चुकून मासिकाखाली गेलं असणार." आपण पत्र तिथं ठेवलंय हे रागिणी विसरून गेली होती.
शमानं ह्यावर काही न बोलता मुकाट्याने पत्र फोडून वाचलं आणि विक्रमच्या हातात दिलं. त्यानं वाचून ताबडतोब ते फाडून त्याच्या बारीक बारीक चिंध्या
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/121
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १२१