ओढ पाहिली की रागिणीला स्वत:शी कबूल करावं लागायचं, की हा आविष्कार काही वेगळाच आहे. ही मुलं आपल्याशी कितीही मायेनं वागली तरी तिच्याबद्दल त्यांना जे वाटतं ते आपल्याबद्दल कधीच वाटलं नाही, कदाचित वाटणार नाही. पण थोड्या दिवसांनी पुन्हा क्रांती विसरून जायची आणि रागिणी स्वत:शी म्हणायची, शेवटी मी इथं आहे आणि ती नाहीये. तिच्याबद्दल त्याना जे वाटतं ते हाडामांसाच्या बाईबद्दल वाटत नाही, एका अमूर्त कल्पनेबद्दल वाटतं.
जेवण झाकून ठेवून रागिणी बाहेर आली. धरम अजून फाटकाशी होता. त्याच्याशेजारी जाऊन ती उभी राहिली. आता सूर्यास्ताचे अगदी शेवटचे रंगसुद्धा मावळून आकाश काळं झालं होतं. झाडांतून अधनंमधनं शेजारच्या घरांच्या उजळलेल्या खिडक्या दिसत होत्या-सुरक्षित घरट्यातून सावधपणे बाहेरच्या अंधाराकडे बघणाऱ्या डोळ्यांसारख्या. रस्त्याच्या दिव्यांभोवती असंख्य किडे पिंगा घालीत होते. सकाळी प्रत्येक दिव्याखाली मेलेल्या किड्यांचा खच दिसणार होता.
"हे का आत्महत्या करतात अशी?" रागिणी म्हणाली.
"अं?"
"किडे"
धरमला हसू फुटलं. "त्यांचं आयुष्यच तेवढं असतं." त्याने तिला वेढून जवळ ओढलं. पुष्कळ दिवसांत त्याला ती त्याच्या इतकी जवळ आलेली आठवत नव्हती. एकदम एक तयार कुटुंब पदरात पडल्यामुळे असेल, पण त्याला विक्रम आणि शमाचा बाप ही भूमिका समरसून पार पाडणं जमलं नव्हतं. तो रागिणीच्या ह्या नव्या आयुष्याच्या परिघावरच राहिला होता.
"मुलांना उशीर झालाय आजसुद्धा," रागिणी म्हणाली.
सुरुवातीला रागिणी विचारायची; "का रे, आज एवढा उशीर?" मुलं सबबी सांगायची. आज काय टेनिस, उद्या वक्तृत्वस्पर्धा, परवा कुणी मित्रानी दिलेली पार्टी. जेव्हा रागिणीला उमजलं की ठरवून दिल्यासारखी ही ओठावर येणारी उत्तरे म्हणजे खरी कारणं नव्हेत. तेव्हा तिने त्यांना छेडणं बंद केलं. मग क्रांतीचं काय झालं ते आठवून ती व्याकूळ व्हायची. सुरेख उभारलेलं आयुष्य आपल्या हातांनी ती का फेकून देतायत ते तिला कळेना.
रागिणी शहारली ते धरमच्या हाताला जाणवलं. तिच्या अंगावर उठलेला शहारा पावसाळी रात्रीच्या गारठ्यामळे उठला नव्हता हे त्याला कळलं.
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/120
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १२०