मध्यभागी अडला. त्यानं काही केलं तरी पुढं जाईना. शेवटी त्यानं भगवान कृष्णाचा धावा केला, आणि जसा अचानक घोडा थबकला होता तसाच तो एकदम पुढं चालायला लागला. घोडा जिथं अडला होता तिथं घोड्याचं देऊळ बांधण्यात आलं. या गोष्टीमुळं आणखी एका चालीचा खुलासा मिळतो. या पंथाचे अनुयायी आपली मनोकामना पुरी करण्यासाठी देवाला पितळेचे घोडे वाहतात. उत्सवाच्या दिवशी सकाळी या घोड्यांची पूजा होते. घोड्याच्या देवळापर्यंत ते मिरवत नेले जातात आणि परत आणण्यात येतात."
लेविन एका लहानशा वहीत झपाझप टाचणं करीत होता. "झकास," तो म्हणाला. "आता पुढं जाऊया आणि आणखी एक दोघांकडून या गोष्टीची शहानिशा करूया."
त्याची वृत्ती थंड आणि चिकित्सकाची आहे. तिला वाटलं, सध्यापुरतं तुझ्या सर्व क्रियांचं ध्येय म्हणजे तुझं पुस्तक. विल्यम लेविन आणि कुणीतरी यांनी लिहिलेलं. माझ्या लोकांची अंधश्रध्दा, मूर्खपणा, अज्ञान आणि हा पाखंडी उत्सव यांचं तपशीलवार वर्णन असणारं. तू दुसऱ्या कुठं का जात नाहीस? मूर्तिभंजकाचं काम दुसऱ्या कुठंही जाऊन करता येईल. आमचा पिच्छा सोड. या परकी माणसाला खुषीनं सगळी माहिती देणाऱ्या लोकांकडं पाहून तिची कानशिलं रागानं तप्त झाली. किती अडाणी आहेत हे, किती स्वाभिमानशून्य! नसत्या उठाठेवी करू नकोस असं का सांगत नाहीत लोक त्याला?
मिरवणुकीत आता आणखी लोक सामील झाले होते. गर्दीच्या लोंढ्यात चालताना ती वरच्यावर लेविनच्या अंगावर आदळत होती. एकदा-दोनदा तिनं त्याच्याकडे ओझरतं पाहिलं. पण तो दंग होता- पाहण्यात, नोट्स घेण्यात, कॅमेरा रोखण्यात. एकदा ती अडखळली तेव्हा निर्विकारपणे त्यानं तिचा हात धरला आणि तिला सावरलं.
'कदाचित बायकांना जीवनाच्या काठावरच राहू देण्याचा पुरुषांचा कट असावा.' तिला रागाच्या भरात वाटलं.
थोड्याथोड्या अंतरावर मिरवणूक थांबायची. प्रत्येक ठिकाणी लोक घोड्यावर कुंकू आणि फुलं उधळायचे. कुणीतरी अधून-मधून ढोलके-वाल्यांच्यावर मुठीमुठीनं गुलाल फेकायचे. त्यांचे काळसर चेहरे त्या भडक गुलाली रंगानं माखले गेले होते. नाचण्याची आणि ढोलक्यांची लय जसजशी वाढत जात होती तसतसे त्यांचे तारवटलेले डोळे त्या गुलाबी रंगामधून एका वेडसर