पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/119

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हटलं, काही काळजी करू नको, मुलं माझ्याकडे राहतील म्हणून."
 "प्रस्थापित सरकारविरुद्ध बंड करणाऱ्यांना पाषाणहृदयीच व्हावं लागतं लहानसहान व्यक्तिगत बाबींसाठी जर ते भावविवश व्हायला लागले त्यांचा मार्ग त्यांना सोडूनच द्यावा लागेल."
 "मुलं ही लहानसहान बाब आहे?"
 "त्यांच्या लेखी आहे.”
 "मग त्यांना मुलं होण्याचा हक्क नसावा."
 "हे कुणी ठरवायचं रागिणी? समाजात अशा वाटण्या होतात का, अमक्यांनी मुलं वाढावायची, तमक्यांनी क्रांती करायची, अशी?"
 "मग क्रांती करून तुरुंगात जाणाऱ्यांची मुलं कुणी वाढवायची?"
  तुझ्यामाझ्यासारख्या पुढचामागचा विचार करून सुरक्षित आयुष्य जगणाऱ्यांनी."
 त्याच्या स्वरातल्या उपरोधाने तिला नांगी मारल्यासारखं झालं. ती उसळून म्हणाली, "सुरक्षित आयुष्य जगण्याची एवढी लाज वाटते तर तूही क्रांतीसारखा तुरुंगात का जात नाहीस?"
 पुष्कळ वर्षे गेली आणि क्रांती कधीतरी सुटून येण्याची आशा मावळायला लागली. न्यायलयासमोर उभंही न केलं जाता तुरुंगात खितपत पडलेल्या हजारो जणातली तीही एक. महिन्यातून एक पत्र पाठवायची तिला परवानगी असे, पण त्यातून ती जिवंत आहे ह्यापलीकडे काहीच बातमी कळत नसे.क्वचित शिक्षा भोगून सुटून जाणारा गुन्हेगार किंवा लाचेला बधलेला कुणी जेलर ह्यांच्याकरवी एखादं खरं पत्र यायचं.
 रागिणीच्या मनात क्रांतीची प्रतिमा खूप पुसट झाली होती. प्रथम प्रथम ती कटाक्षाने ही क्रांतीची मुलं आहेत. मी त्यांना नुसती संभाळतेय. असं स्वतःला बजावीत असे. पण फारच दिवस गेले तेव्हा ह्या खबरदारीची गरज वाटेनाशी झाली. क्रमाक्रमाने तिने इतके दिवस निषिद्ध ठरवलेल्या विचारांची चव घ्यायला सुरुवात केली. आता कुठली क्रांती परत येतेय! आणि आलीच तर आता तिच्यात आणि मुलांच्यात कसले बंध राहणार आहेत? तिनं ज्यांना या वर्षांपूर्वी सोडलं ती ही मुलं नाहीतच. ही दोन वेगळी माणसं आहेत वेगळ्या संस्कारांतून निर्माण झालेली, परकी.
 दर पत्रातून क्रांती परत यायची, मग मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, औत्सुक्य

कमळाची पानं । ११९