हे पान प्रमाणित केलेले आहे.
कावळीचं घरटं
तिच्या पत्रामुळे सबंध संध्याकाळ वाईट
जाऊ नये म्हणून रागिणीने ते उचलून
ठेवलं. बेत असा, की त्या क्षणापर्यंत आपण
विसरलोच होतो असा आव आणून झोपायला
जाताना मुलांच्या हातात ते पत्र ठेवायचं.
धरमने अर्थातच ते बैठकीच्या खोलीतल्या
छोट्या टेबलावर ॲश-ट्रेला टेकवून असं ठेवलं
होतं, की खोलीत येणाऱ्याला ते आल्या
आल्या दिसावं. तिनं ते उचलून काही
मासिकांच्या खाली खुपसून ठेवलं.
धरम बागेतनं आत आला नि म्हणाला
"क्रान्तीचं पत्र कुठंय?"
"मी तिकडे उचलून ठेवलंय."
"ते का?" धरमच्या आवाजातनं आश्चर्य
ओथंबत होतं.
त्याचा स्वभाव फारच सरळ आहे का फारच
वाकड्यात शिरणारा आहे ह्याबद्दल बरेचदा
विचार करूनही तिला नक्की उत्तर सापडलं
नव्हतं.
ती म्हणाली, "कारण आल्या आल्या
त्यांनी पत्र फोडलं की संध्याकाळभर बोलायला
तोच विषय होणार."