Jump to content

पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जगन्मान्य तत्त्व सांगितल्यासारख्या कोरड्या आवाजात ती म्हणाली, "जे झालं ते बरं असेल, वाईट असेल, पण त्याला ती दोघं सारखीच जबाबदार आहेत."
 "सारखी जबाबदार कशी असतील? तो काही तिला सोडून गेला नाहीये आणि त्यानं तिला हाकलून पण दिलं नाहीय."
 "जवळजवळ दिलंय असंच म्हणायला पाहिजे. त्यानं तिला काही पर्यायच ठेवला नाही. एकदा तिथं राहणं तिला शक्य नाही म्हटल्यावर तिन इथं राहून वकिली केली तर चालेल, असं कबूल करायला हरकत होती त्याला? तो काही समजून घ्यायला तयारच नव्हता. 'निघून गेलीस तर तुझं-माझं नातं संपलं' असा पवित्रा त्यानं घेतल्यावर ती दुसरं काय करू शकणार?
 "तो का म्हणून तयार असेल?" एकदम हमरीतुमरीवर येऊन त्यानं विचारलं. परिस्थिती कुठल्याही तऱ्हेनं बदलली नसताना त्यानं हा बदल का मान्य करावा?"
 "परिस्थिती बदलली नाही असं कसं म्हणतोस? अमूक तऱ्हेचं आयुष्य आपण जगू शकत नाही असं कळून चुकणं हा परिस्थितीतला बदलच नव्हे का? हे कळल्यावर तिनं मन मारून तसंच जन्मभर रखडत रहावं अशी अपेक्षा असंस्कृत आणि निर्बुद्ध आहे. त्यामुळे तिला सुख लागणार नाहीच, पण त्याला तरी कसं लागेल?"
 "सर्वस्वी आपल्या मनासारखं वागणं म्हणजे सुख, अशी जर माधवीची कल्पना असली तर मग तिनं केलं ते ठीकच केलं."
 "त्याचीही तीच कल्पना नाही का?" त्याच्या उपरोधाने चिडून जाऊन तिनं विचारलं, "सगळं मला हवं तसं कर नाही तर तुझा माझा संबंध तुटला."
 "त्याला हवं तसं नाही, सुरुवातीला तिनं कबूल केलं तसं."
 "पुन्हा तेच. एकदा घेतलेल्या निर्णयाला काय वाटेल ते झालं अखंड चिकटून राहिलं पाहिजे हा कुठला न्याय?"
 "त्यांचं आजचं जे नातं आहे ते त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरच ना? मग तो निर्णय फिरवणं म्हणजे ते नातं तोडून टाकणं नव्हे का?"
 तिला वाटलं, पोहायच्या तलावाच्या काठच्या घसरगुंडीवरून ओल्या अंगानं घसरतोय आपण. वेग वाढत चाललाय आणि आता कुठल्याही क्षणी पटकन पाण्यात पडणार आपण. ती म्हणाली, "नवराबायकोचं नातं असल्या क्षुल्लक

कमळाची पानं । ११२