पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ऐकणाऱ्याला कळतंच. कोणत्याच पुरुषाला वाटत नाही."
 तिच्या तोंडून असं बाहेर पडलं न् मग तिला वाटलं. आपण असं बोलायला नको होतं. माणसांची लिंगभेदावर आधारित वर्गवारी करायची नाही असा त्यांच्यातला अलिखित करार होता.
 ती म्हणाली, "म्हणजे मी तुलाच दोष देतेय असं नाही. आपल्या समाजव्यवस्थेचाच तो दोष आहे. कितीही पुरोगामी पुरुष झाला तरी लग्नात तडजोड करायची ती बायकोनंच, असं धरून चालतो."
 पहिल्यांदा बोललेलं सावरून घ्यायला जे बोललो ते जरा जादाच ठासून बोललो असं तिला वाटलं.
 ती म्हणाली, " भाजी घे ना आणखी."
 "नको आणखी."
 "हे रे काय! वादातला राग जेवणावर कसला काढायचा?"
 "कमाल आहे. कोण म्हणतंय मी जेवणावर राग काढतोय?"
 "नाही तर काय! एरवी कारल्याची भाजी असली की दुसऱ्यांदा वाढून घेतल्याखेरीज तुझं जेवण होत नाही."
 "भूक नसते एखाद्या दिवशी. भात कर इकडे."
 त्याच्या तुटकपणाचा तिला राग आला. तो काही बोलेल म्हणून तिनं वाट पाहिली पण तो न बोलता जोरजोराने भात कालवीत राहिला. भात कालवताना त्याचा हात तळव्यासकट खरकटा व्हायचा. मग तो हात ताटाच्या कडेला पुसून जेवायला लागायचा. पहिल्यापहिल्यांदा तिला ह्या सवयीची शिसारी यायची. एकदा ती त्याला म्हणालीसद्धा. "भात कालवताना सबंध हात भरवायची काय गरज असते? असा नुसता बोटांनी कालवायचा. "तो प्रयत्नसुध्दा न करता म्हणाला होता, "आपल्याला नाही बुवा जमत ते." हळूहळू ती त्या बाबतीत दुर्लक्ष करायला शिकली होती.
 ती म्हणाली, "मी जे बोलते ते उत्तर देण्याच्या लायकीचं वाटत नाही तुला?"
 "तू प्रश्न विचारला नव्हतास, विधान केलं होतंस.'
 "तरी पण त्याच्यावर मत प्रदर्शित करण्याची गरज नव्हती!"
 "मी जे मत प्रदर्शित केलं असतं ते तुला आवडलं नसतं. उगीच कशाला भांडणाला तोंड लावायचं?"
 ती एकदम स्तब्ध झाली. तिला वाटलं, माणूस ज्यांच्याशी संघर्ष टाळतो

कमळाची पानं । ११०