पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "तू या प्रश्नाकडे कधी वळणार याचा मी विचारच करीत होतो. लग्नासंबंधी माहिती मिळाल्याखेरीज एखाद्या माणसाशी आपली पुरेशी ओळख झालीय असं स्त्रीला वाटतच नाही मुळी."
 "नसत्या चौकशा करण्याचा माझा हेतू नव्हता, सॉरी!"
 "वाईट वाटून घेऊ नको."
 जिला तो प्रेमपत्रं लिहितो अशी एखादी मुलगी दूर त्याच्या मुलुखात आहे का असं तिला विचारावंसं वाटत होतं. पण तो हसल्यानंतर तिनं काही विचारलं नाही.
 शहरात पोचल्यावर त्यानं गाडी उभी केली, आणि ते दोघं कृष्णाच्या देवळापर्यंत पोचले. कृष्णसंप्रदायाचं ते प्रमुख मंदिर होतं. मिरवणुकीला नुकतीच सुरुवात झाली होती. देवळातून पितळी घोडे घेऊन बाहेर येणाऱ्या माणसांचा एक चांगला शॉट लेविनला घेता आला. ह्या भागातल्याच एका माणसानं स्थापन केलेला हा कृष्णभक्त संप्रदाय इथं काही शतकांपासून जोमानं वाढला होता. या संप्रदायाचे अनुयायी हिंदुस्थानभर विखुरलेले होते. पण त्या गावातलं कृष्णाचं देऊळ, संप्रदायाच्या मूळ पुरुषाला जिथं कृष्णाचा साक्षात्कार झाला त्याच जागेवर बांधलं होतं आणि इथला मठ-आता तिथं संप्रदायाचे सध्याचे स्वामी राहात होते, या सगळ्या अनुयायांचं मुख्य तीर्थस्थान होतं. उत्सवासाठी शेकडो लोक जमा व्हायचे.
 केशरी आणि पांढरा पोषाख चढवलेले ढोलकेवाले मिरवणुकीच्या अग्रभागी होते. लेविन आणि सरोजिनी मिरवणुकीत मिसळले. त्यांच्या बाजूनं चालणाऱ्या एका माणसाबरोबर सरोजिनी थोडा वेळ बोलत होती. नंतर ती लेविनकडे वळली- "या उत्सवाला सुरुवात कशी झाली याचं फार कल्पनारम्य स्पष्टीकरण देतो आहे तो," ती म्हणाली. "तुला ऐकायचंय?"

 "हो तर. जेवढी माहिती मिळेल ती सगळी मला पाहिजेच आहे. नंतर मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करीन. कदाचित आम्ही काही काटछाट करू त्यात. पण माझ्याजवळ सगळी माहिती असणं हे महत्त्वाचं आहे. पुष्कळदा मी ज्या ग्रंथांतून या उत्सवांची पार्श्वभूमी गोळा करतो ते या सगळ्या दंतकथांचा उल्लेख करीत नाहीत. बहुधा उत्सव चांगला रूढ झाल्यावरच या दंतकथा निर्माण होऊ लागतात, हे त्याचं कारण असावं."
 "हा माणूस म्हणतो की याची सुरुवात सातशे वर्षांपूर्वी झाली. यात्रेहून परत येणारा एक गुराखी नदी ओलांडत होता. अचानक त्याचा घोडा पात्राच्या


कमळाची पानं । ११