पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/108

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिला वाटलं. ती खाली मान घालून जेवायला लागली, पण जेवणात तिला रस वाटेना.
 तो म्हणाला, "हं. नुसत्या प्रेमाबद्दल बोलत होतो आपण."
 "बोलून संपलं होतं."
 "संपलं होतं?"
 "हो."
 "मग मला मुद्दाच कळला नाही तू काय म्हणालीस त्याचा."
 "जाऊ दे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी सारख्या कळायलाच पाहिजेत असं नाही."
 "राहिलं."
 पुन्हा थोड्या वेळाने तो म्हणाला, "मग आणखी काय म्हणत होती माधवी?"
 "काय म्हणणार? रडत होती!" ती वैतागून म्हणाली.
 "तिला रडायला काय झालं? हा निर्णय तिनंच घेतलाय ना?"
 "पण म्हणून वाईट वाटायचं राहत नाही ना?"
 "अरेच्या! इतकं वाईट वाटत असलं तर हेमाकडे परत जायला कुणी नाही म्हटलंय का तिला? आपल्या बोटावर हातोडा मारून घ्यायचा नि मग 'ओय ओय' करीत बसायचं ह्याला काय अर्थ आहे?"
 एक सूक्ष्म अप्रिय संवेदना तिला जाणवली. ती म्हणाली, "असं म्हणता येणार नाही तुला."
 "मग कसं म्हणता येईल?" त्याने हसत हसत विचारलं.
 "नवराबायकोत बेबनाव झाला की त्यांतल्या एकालाच कसं जबाबदार धरता येईल?' ती तावातावाने म्हणाली.
 "एरवी मीही असंच म्हटलं असतं गं," तिला जरा चुचकारत तो म्हणाला, "पण इथं मला अगदी सरळ मामला दिसतोय. काही कारण नसताना माधवीनं हेमाला सोडलं आहे."
 "कारण नसताना कसं सोडील? ती काय वेडीबिडी आहे का?"
 "एवढी चिडतेस कशाला? काही नवीन कारण नाही असं म्हणायचंय मला. हेमा जिथं राहतो ते अगदी लहानसं खेडं आहे. तिथं तिला तिची वकिली चालवता यायची नाही. म्हणजेच तिचं त्या क्षेत्रातल शिक्षण अनुभव वाया जाणार. ह्या सगळ्या गोष्टी तिला लग्राआधीच माहीत होत्या.

कमळाची पानं । १०८