नाही, पण माधवीला भेटल्यावर मला नाही वाटत ते पुन्हा एकत्र येतील म्हणून."
"तू माधवीला भेटलीस?" त्याने आश्चर्याने विचारलं.
"हो, गेले होते मुद्दाम- काय प्रकार आहे ते तिच्याकडून ऐकावं म्हणून."
"मग आधी कशी बोलली नाहीस? काय म्हणत होती माधवी?"
"म्हणाली, आत्ता हिंमत आहे तोवरच हे करायला पाहिजे. मग सवयीची गुलाम बनले म्हणजे व्हायचं नाही, आणि आयुष्यभर स्वत:शी प्रतारणा केल्याची टोचणी लागून राहील."
"बाप रे! अगदी नाटकातला डायलॉगच टाकलान म्हणायचा! साध्या सोप्या भाषेत ह्याचा अर्थ काय ते समजावून सांग बघू मला."
तिला त्याचा चेष्टेचा स्वर आवडला नाही. ती म्हणाली,
"त्यात समजावून सांगण्यासारखं काय आहे? इतका काही निर्बुद्ध नाहीयेस."
जरासा ओशाळून तो म्हणाला, "तसं नाही गं. पण एकदम तडकाफडकी हेमाला सोडून जाण्याचा निर्णय घेण्यासारखं काय घडलं?
"हा तडकाफडकी निर्णय नव्हताच."
"म्हणजे इतके दिवस प्रेमाचं नाटक बेमालूमपणे वठवताना ती लग्न मोडायचा विचार करीत होती?"
"ते नाटक होतं असं कसं तू म्हणतोस? तिचं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे."
"जिचं त्याच्यावर प्रेम आहे ती त्याला सोडून कशाला देईल?"
"काही गोष्टी प्रेमाच्या पलीकडच्या असतात."
"उदाहरणार्थ"
"उदाहरणार्थ, एक संपूर्ण माणूस म्हणून जगण्याची संधी. ती तिला जो नाकारतो त्याच्याबरोबर नुसत्या प्रेमाखातर ती कशी राहू शकेल?"
"नुसतं प्रेम? नुसतं प्रेम?"
"ओरडू नको आणि प्रेमाची महती वगैरेवर लेक्चर देण्याचाही आव आणू नको."
त्यानं मान हलवली- 'मी कधी कुणाला लेक्चरं दिलीयत' असा चेहरा करून. ते पाहून तिला एकदम हसूच आलं आणि ठसका लागला. त्यानं तिच्या पाठीत धपाटे घातले. मग ती पाणी प्यायली. त्याच्या नको तिथं विनोद करण्याच्या सवयीला आपण हसून उत्तेजन द्यायला नको होतं असं
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/107
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १०७