पान:ओळख (Olakh).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 स्वतः अभिनवगुप्त अनेकदा जिथे जे रस नाहीत तिथे ते रस आहेत असे सांगतात. उदा० अभिनवगुप्तांच्या मते रस हा प्रधान भोक्त्यांशी निगडीत असतो. शाकुंतलच्या पहिल्या अंकात प्रधानभोक्ता दुष्यंत आहे पण अभिनवगुप्त त्या ठिकाणी भ्यालेल्या हरणाच्या निमित्ताने भयानक रस आहे असे सांगतात. हर्षाच्या नाटकात प्रधान भोक्ता उदयन आहे. पण योगंधरायणाच्या रूपाने तेही भयानकाचे उदाहरण आहे असे अभिनवगुप्त मानतात. शृंगारप्रधान नाटकात शंगारिक प्रसंगांना आरंभ होण्यापूर्वी भयानक रस आहे असा तर याचा अर्थ होतोच पण रस आनुषंगिक पात्राच्या आधारे ठरू शकतो, असाही याचा अर्थ होतो. दुष्यंत नायक असताना आणि त्याच्या ठिकाणी मगयेचा उत्साह असताना इथे रस भयानक मानावा लागतो. अभिनवगुप्तांना अनुसरून पुढे शेकडो मंडळींनी या ठिकाणी भयानक रस मानलेला आहे आणि कंगले यांनाही केवळ भाषांतर करण्यापलीकडे काही महत्त्वाचे असे लक्षणीय येथे जाणवत नाही. रसचर्चेच्या बाबत जर सूक्ष्मतेचा आपण आग्रह धरणार नसू आणि केवळ भाषांतर करणे पुरेसे मानणार असू तर परंपरासिद्ध, परंपराप्रमाण भूमिका पुनःपुन्हा मांडाव्या यापेक्षा अभ्यास अधिक खोलवर जाण्याचा संभव कमी आहे.

 संस्कृत काव्यशास्त्राचा विशेषतः भरतनाटयशास्त्राचा अभ्यास करताना नट, पात्र आणि प्रकृती हे तीन शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. विशेषतः पात्र या शब्दाचा उत्तरकालीन वापर आणि पूर्वकालीन वापर यांत फरक आहे. ललित वाङमयाच्या आत असणा-या व्यक्ती म्हणजे काव्यात अगर नाटयात असणारा कलात्मक व्यवहाराचा अंतर्गत असा जो माणूस याला नाटयशास्त्रात प्रकृती असे म्हटले आहे. नट दुप्यन्ताचा भूमिका करतो. याचा अर्थ स्वतःची प्रकृती आच्छादितो आणि स्वत: भिन्न प्रकृतीचे तो स्वतः वाहन होतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नट दुष्यंत ह्या प्रकृतीचे साधन मात्र आहे. त्यामळे आस्वाद नटाचा नसतो, आस्वाद प्रकृतीचा असतो. ही प्रकृती ज्या भांड्यात भरायची ते भांडे म्हणजे पात्र म्हणून पात्र हा शब्द नेहमीच नटाशी निगडीत असतो. आधुनिक पद्धतीने हा मुद्दा मांडायचा तर वालगंधर्व हे पात्र असून सिंधू ही प्रकृती आहे. असे तरी म्हणावे लागेल किंवा वालगंधर्व हा नट सिंधू या प्रकृतीचे नाट्यप्रयोगात पात्र होतो असे तरी म्हणावे लागेल. नाटयशास्त्रात एका स्वतंत्र अध्यायात उत्तम, मध्यम, अधम आणि संकीर्ण असा प्रकृती विचार करण्यात आलेला आहे. दिसायला हा मुद्दा अतिशय सोपा दिसतो, परंतु हा मुद्दा आपण एकदा नीट समजूत घेतला तर त्यातून सगळ्या संस्कृत रसव्यवस्थेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोणच उपलब्ध

ओळख

८६