पान:ओळख (Olakh).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सारख्या असतात त्यांच्या बाबतीत एका ठिकाणी मतभेद आहे अशी भमिका संभवते. जे लेखक परस्परविरोधी गटातले आहेत त्यांच्या एका बाबतीत मतभेद आहे असे म्हणता येत नाही. नाट्यदर्पणकार जैन आहेत त्यांची आत्म्याविषयीची कल्पना भिन्न आहे. हा धार्मिक तत्त्वज्ञानाचा मतभेद तर आहेच, पण मुख्य म्हणजे नाटयदर्पणकारांसाठी काव्यानुभव अलौकिक नसून लौकिक आहेत. काव्यानुभव लौकिक मानणारी जी परंपरा संस्कृत काव्यशास्त्रात आहे, त्या परंपरेत नाट्यदर्पणकार येतात. अभिनवगुप्त काव्यानुभव अलौकिक मानणान्या गटाचा सर्वात मोठा प्रतिनिधी आहे; म्हणन नाट्यदर्पणकार व अभिनवगप्त हे भिन्नपरंपरेचे लेखक आहेत असे मानावे लागते. एका मद्यावर त्यांचा मतभेद आहे, असे म्हणता येत नाही. नाट्यदर्पणकारांची सगळी रसविषयक कल्पनाच भिन्न आहे. असे असताना कंगले जर दोघांच्यामध्ये फक्त एका मद्यावर मतभेद आहे असे म्हणत असतील तर त्यांच्या मते केवलानंदवादी आणि सुखदुःखवादी यांच्यातील फरक किरकोळ असायला हवा. कोणत्या कारणामुळे असे विवेचन कंगले करतात हे समजणे कठीण आहे.
 क्रमाने अशा प्रकारचे अनेक मतभेद तपशिलाने दाखविता येतील पण ह्या मतभेददर्शनातही अर्थ नाही. सामान्य वाचक आणि चिकित्सक अभ्यासक उभयतांना असमाधानकारक अशा ग्रंथात हे व्हायचेच. ह्याला खरे उत्तर हे आहे की, कंगले यांच्यासारख्या लेखकाने सामान्य वाचकांसाठी सोपा व सुबोध लिहिण्याचा नाद सोडून द्यावा आणि चिकित्सक वाचकांसाठी साधार विवेचक असेच लिहावे. कंगले यांनी जर असा प्रयत्न केला तर तो काव्यशास्त्राच्या अभ्यासकांना निश्चितच उपकारक ठरेल अशी माझी खात्री आहे.

 ' रसभाव विचार' या ग्रंथाचे स्वरूप मात्र असे नाही. कारण याठिकाणी स्थल स्वरूपात सुवोध परिचय करून देणे अशी कोणतीही भानगड नाही. भरतनाट्यशास्त्र हा भारतीय परंपरेचा सर्व कला विचारांचाच बीजग्रंथ आहे. काव्यशास्त्राचा हा प्राचीन ग्रंथ आहे हे तर खरेच पण नृत्य, नाट्य, संगीत ह्यांचाही सर्वांत प्राचीन उपलब्ध ग्रंथ हाच आहे. पुढे चालून शिल्पशास्त्राने आणि चित्रकलेनेही रसव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे भरतनाटयशास्त्र हा सगळ्या प्राचीन कलात्मक व्यवहारात मध्यवर्ती ठरलेला ग्रंथ आहे. अशा या बीजग्रंथाचे काव्यशास्त्राच्या इतिहासाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे ठरलेले दोन अध्याय-६ आणि ७ हे आहेत. पैकी सहाव्या अध्यायात नाट्यशास्त्रातील र सविचार असून ७ व्या अध्यायात नाट्यशास्त्रातील भावविचार आहे. या दोनही अध्यायांची मूळ संहिता छापणे, त्यांचे प्रमाण मराठी भाषांतर करणे आणि विषय उलगडन दाखविण्यासाठी आवश्यक असणा-या टीपा देणे हेच एक

ओळख

७९