पान:ओळख (Olakh).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नुसार अभिनव गुप्तांनी रसव्यवस्था सुसंगत करून टाकली आहे. पण ती सुसंगत होण्यासाठी "आस्वाद्य" म्हणजे रस ही भूमिका सोडून आस्वाद म्हणजे रसही भूमिका घेतली पाहिजे. कवीची विवक्षा लक्षात घेऊन स्वायीभावाचा आश्रय ठरवावा लागतो हे मत आस्वाद म्हणजे रस या भूमिकेचे आहे. तर्कतीर्थ आस्वाद्य म्हणजे रस ही भूमिका घेऊन विवेचन करीत आहेत.

 खरे म्हणजे मढेकरांचा आक्षेप अभिनवगप्त, मम्मट यांच्यावर नाही. त्यांनी सरळ भरत नाट्यशास्त्रावरच आक्षेप घेतलेला आहे. " नाट्यशास्त्रातील भरताचा रससिद्धांत ही सौंदर्यशास्त्रातील अत्यंत सुसंगत अशी बौद्धिक उपपत्ती आहे." असा दावा करणाऱ्यांनी मढेकरांच्या आक्षेपाचे उत्तर भरत नाटयशास्त्रातून दिले पाहिजे. नाट्यशास्त्रात स्थायीभाव सांगताना कवीची विवक्षा सांगितलेली नसून नेहमी काव्यांतर्गत व्यक्तीचे मनच स्थायीभावांचा आश्रय मानलेले आहे. भरत नाट्यशास्त्रात रसांचे वर्णन चालू असले म्हणजे असा स्पष्ट उल्लेख असतो को अमक रसाचा स्थायीभाव असा आहे. उदाहरणार्थ करुणरसाचा स्थायीभाव शोक आहे. पुढ असा उल्लेख असतो की अमूक विभावांनी तो उत्पन्न होतो. त्याचे अभिनय अमुक अनुभाव आहेत आणि रस पुष्ट होण्यासाठी व्यभिचारीभाव अशा प्रकारचे आहेत. रससूत्रात ज्या प्रमाणे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी क्रमाने येतात त्याप्रमाणेच प्रत्येक रसाच्या वर्णनात ते क्रमाने येतात. पुढे भावांच्या अध्यायातसुद्धा प्रत्येक भाव विभावांनी उत्पन्न करायचा आणि त्याचा अनुभाव अभिनयाने दाखवायचा असा उल्लेख असतो. त्यामुळे कोणत्याही भावाचा विचार विभाव आणि अनुभाव म्हणजे अभिनय यांचा संदर्भ घेतल्याशिवाय करता येत नाही. विभाव आणि अभिनय ही प्रयोगांतर्गत, नाटयांतर्गत वाव असल्यामुळे सारेच स्थायीभाव हे नेहमी नाट्यांतर्गत व्यक्तीचे भाव मानावे लागतात. स्थायीभाव हा नटाचा भाव नसेल किंबहुना नसतो पण भरतनाट्यशास्त्रात तो नाटकांतर्गत व्यक्तीचा भाव आहे. परिणामी रसांचा विचार चाल असताना तिथे प्रयोगाचाच विचार चाल असतो. भरतनाट्यशास्त्रात भयानक हा रस प्रेक्षकांना भीती वाटण्यावर अवलंबून नसून नाटयांतर्गत व्यक्तींना भीती वाटण्यावर अवलंबून आहे. हीच गोष्ट बीभत्सरसाची आहे. म्हणजे नाट्यशास्त्रात अद्भुताचा आलंबनविभाव आश्चर्य वाटणारी व्यक्ती, बीभत्साच्या बाबतीत जिगुप्सा वाटणारी व्यक्ती, भयानकाच्या बाबत भीती वाटणारी व्यक्ती असे आहे. हीच गोष्ट हास्याला लाग आहे. हास्यरसाचे स्थायीभाव नाटयांतर्गत व्यक्ती आहेत. त्या आधारेच हास्यरसाचे फरक नाट्यशास्त्रात टाकण्यात आलेले आहेत. म्हणून भरत नाटयशास्त्रानुसार हास्यरस निर्माण व्हावयाचा तर नाट्यप्रयोगात विदूषक, राजा, राणी अगर इतर कुणी तरी हसले पाहिजे.

ओळख

७३