पान:ओळख (Olakh).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रांना चालना देण्याची शक्ती आणि विवाद्य प्रश्न उभे करण्याची शक्ती एवढी मोठी आहे त्या सर्व तपशिलात न जाता फक्त दोन मद्यांकडे लक्ष वेधण्याची येथे माझी इच्छा आहे. तर्कतीर्थांनी आस्वाद्य म्हणजे रस ही भूमिका घेतल्यानंतर ही आस्वाद्य वस्तू म्हणजे कलाकृती, आस्वाद म्हणजे सौंदर्यग्रहण आणि आनंद हे त्यांचे फळ. ही भूमिका जर आपण नाट्यशास्त्राच्या आधारे स्वीकारू शकलो, तर ती भारतीयांच्या काव्यशास्त्राच्या स्पष्टीकरणातील एक मौलिक व महत्त्वाची भर आहे असे मानावे लागेल. सुदैवाने डॉ. बारलिंगे यांच्या विवेचनात हा मुद्दा गृहीत आहे. म्हणजे या ठिकाणी तर्कतीर्थ एकटे नसून त्यांना सहकारीही आहेत. प्रश्न फक्त ही भूमिका स्वीकारार्ह ठरते काय, एवढाच आहे आणि तो विवाद्य आहे. तर्कतीर्थांनी सामान्य गुणयोग या भरताच्या शब्दप्रयोगाचा अर्थ एकात्मता असा केला आहे आणि ही एकात्मता म्हणजेच विश्वनाथाने सांगितलेली अखंडता आहे असेही म्हटले आहे. पैकी विश्वनाथ ज्याला अखंडता म्हणतो तो ध्वनिसिद्धांतावर आधारलेला, कविहृदयापासून रसिकहृदयापर्यंत असणारा अखंड व्यापार आहे. हा व्यापार कलाकृतीच्या एकात्मतेपेक्षा निराळा आहे. पण नाट्यशास्त्रातील सामान्य गुणयोग या शद्वप्रयोगाचा अर्थ कलाकृतीची एकात्मता असा करता येणे शक्य आहे. आलंबन विभाव, उद्दीपन विभाव, अनुभाव, व्यभिचारीभाव यांची स्थायीभावाशी एकात्मता असा जर सामान्य गुणयोगाचा अर्थ केला तर तसा तो करता येणे शक्य आहे. तर्कतीर्थांनी तो केलेलाही आहे. हा अर्थ जर सर्व नाटयशास्त्राच्या संदर्भात मान्य करता आला तर ती काव्यशास्त्रविवेचनातील एक मौलिक भर मानावी लागेल.

 अशा प्रकारे शास्त्रीबुवांच्या अनेक मामिक सूचनांचा विचार करता येईल. व्यक्तिपरत्वे त्यातील काही सूचना मान्य होतील. काही अमान्य होतील. एक मुद्दा मात्र शास्त्रीवुवांच्या सूक्ष्म नजरेतून कसा सुटला याचे मला आश्चर्य वाटते. हा मुद्दा म्हणजे ठिकठिकाणी नाटयशास्त्रात रसत्वापर्यंत जाणा-या स्थायीभावाचे वर्णन करताना 'वाक अंगसत्त्वोपेतान' असे स्पष्टीकरण दिलेले आहे. म्हणजे स्थायीभाव हा उपेत करण्याचे काम घडताना तिथे अंग म्हणजे शरीर सदैव गहीत धरलेले आहे. आणि नाट्यशास्त्रातील हे अंग कधी पात्राचे म्हणजे नटाचे अंग आहे तर कधी प्रकृतीचे म्हणजे नाट्यांतर्गत व्यक्तीचे प्रयोगातील अंग आहे. नट हा स्थायीभावाला उपेत करणारा आहे. तो स्थायी भावांना व्यक्त करणारा आहे, तसा घेरणारा आहे. म्हणूनच रससूत्रातील 'तत्र' शब्दाचा अर्थ रंगभूमीवर नाट्यप्रयोगात असा करावा लागतो. आजच्या ध्वनिसिद्धांतात हे सामावणे कठीण आहे. आपण फार तर असे म्हणू की भरताची भूमिका संस्कृत साहित्यशास्त्रातील प्रतिष्ठित सर्वसामान्य भूमिका

ओळख

७१