पान:ओळख (Olakh).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्व न ओळल्याबद्दल त्यांनी गं. त्र्यं. देशपांडे यांना दोषही दिला आहे. खरे म्हणणे डॉ. गं. त्र्यं. देशपांडे यांना दोष देण्याचे कोणतेच कारण नाही. कारण देशपांडे यांचा ग्रंथ खंडनमंडनपर नाही. संस्कृत साहित्यशास्त्राला काय म्हणायचे आहे याचे यथार्थ प्रकटीकरण इतकाच त्यांचा हेतू आहे. कोणत्याही खंडनमंडनपर चर्चेत देशपांडे जात नाहीत. एखाद्या वेळी अशा चर्चेत त्यांनी पाऊल टाकले तरी ते क्षमायाचनापूर्वक टाकतात. देशपांडे यांच्या ग्रंथाचा हेतू मम्मट अभिनवगुप्तांना अभिप्रेत असलेले विशेषतः मम्मटाला अभिप्रेत असलेले साहित्यशास्त्राचे स्वरूप उलगडून दाखविण्याचा आहे आणि या मर्यादेत त्यांचा ग्रंथ पूर्ण यशस्वी आहे. सर्व परंपरागत विचारवंतांची जी अडचण असते तीच ग. त्र्यं. देशपांडे यांची असते. सर्वजण मनुस्मृती मानणारेच असतात. पण प्रत्यक्षात व्यवहारमयुखाद्वारे मीताक्षरा, मीताक्षरेद्वारे याज्ञवल्क्य आणि याज्ञवल्क्याद्वारे मनु पाहण्याची परंपरेची पद्धत असते. मन महाराजांच्या नावाने जसे व्यवहारमयुखाचे शासन चालते तसे ग. त्र्यं. देशपांडे भरताचे नाव घेऊन अभिनवगुप्त सांगतात आणि अभिनवगुप्त सांगताना ते खरे म्हणजे मम्मट सांगत असतात. शास्त्रीबुवांनी सरळ भरतनाट्यशास्त्राला हात घातलेला आहे.
 नाटयशास्त्रात रसव्यवस्थेचे नेमके स्वरूप काय आहे हे सांगताना तर्कतीर्थानी अतिशय स्पष्टपणे याची नोंद घेतलेली आहे की भरताच्या समोर रस हा आस्वाद नसून आस्वाद्य आहे. आस्वादापेक्षा निराळी, रसही आस्वाद्य वस्तू आहे हा मुद्दा आधुनिक मराठीत प्रथम डॉ. बारलिंगे यांनी आग्रहाने स्पष्ट केलेला आहे. आस्वाद आणि आस्वाद्य यांच्यात घोटाळा केल्याबद्दल तर्कतीर्थ, डॉ. ग. त्र्यं. देशपांडे यांना दोप देतात. वस्तुस्थिती अशी आहे की, आस्वाद म्हणजे आस्वादविषयाला आस्वादस्वरूप मानणारी भूमिका. आनंदवर्धनापासून जगन्नाथापर्यंत अनेकांची भूमिका आहे. संस्कृत साहित्यशास्त्र ज्या ध्वनिसिद्धांताचा आधार घेऊन परिपक्वावस्थेला पोचले त्या सर्व ध्वनिवाद्यांची ही भूमिका आहे. मान्य संस्कृत साहित्यशास्त्र स्पष्ट करणाऱ्या देशपांडे यांच्यासारख्या लेखकाला याहून निराळी भूमिका घेता येणे शक्य नव्हते. यामुळे आस्वाद आणि आस्वाद्य यात गोंधळ करण्याची जबाबदारी ( जर तो गोंधळ असेल तर) अभिनवगुप्तांवर टाकायला पाहिजे आणि जर शास्त्रीबुवांना रस आस्वाद आहे ही भूमिका सोडून रस आस्वाद्य आहे या भूमिकेवर यायचे असेल तर त्यांनी ध्वनिसिद्धांताचा परित्याग केला पाहिजे.

  या प्रकरणात शास्त्रीबुवांनी इतके मार्मिक आणि विवाद्य मुद्दे विवेचनाच्या ओघात उपस्थित केलेले आहेत की त्यांचा सविस्तर विचार करण्यासाठी त्यांच्या पुस्तकापेक्षा मोठे पुस्तक लिहावे लागले शास्त्रीबुवांची विचा-

ओळख

७०