पान:ओळख (Olakh).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पौराणिक कादंबरीने करावे काय हा जिज्ञासेचा खरा प्रश्न आहे. जन्म दुर्दैवी' ला निमित्त करून ही जिज्ञासा मी सर्वांच्या समोर विचारार्थ ठेवीत आहे.
 हे या कादंबरीचे वाङमयीन मूल्यमापन नव्हे; याची मला पूर्ण जाणीव आहे. पण चिंतनपर कादंबरीत भाष्य हाही महत्वाचा भाग असतो. त्याची समर्थनीयता, त्या अनुषंगाने निर्माण होणारे प्रश्न हाही जिज्ञासेचा विषय असतो इतकेच मला म्हणायचे आहे. भाऊसाहेबांची कादंबरी या सगळ्या 'जिज्ञासेला कारण ठरली असेल तर त्यांचे आभार कुणी तरी मानलेच पाहिजेत. माझे आणि त्यांचे ममत्वसंबंध असे आहेत की, मी औपचारिक आभार मानणे त्यांनाही रुचणार नाही; नि मलाही रुचणार नाही.