पान:ओळख (Olakh).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 कर्णाचे निर्भेळ समर्थन करणा-या मंडळींना सतत जाचत असेल तर द्रौपदीवस्त्रहरणाच्या प्रसंगी कर्णाची वागणक. ह्यावेळी कर्णाचा तोल जातो असे देशमुखांसारखा कर्णाचा पक्षपातीसुद्धा म्हणतो. कारण द्रौपदीची वस्त्र काढून घेण्याची सूचना कर्णाची आहे. कर्ण द्रौपदीला वेश्याच ठरवतो. या वाक्याचा नक्की आशय देशमुखांच्या ध्यानात आलेला दिसत नाही. युधिष्ठिराने पणाला लावल्यामुळे व पण हरल्यामुळे द्रौपदी दासी झाली आहे हा कौरवांच्या बाजूचा मुद्दा आहे. युधिष्ठीर प्रथम हरला आणि दास झाला. ही घटना घडून गेल्यानंतर ज्याअर्थी आपणास पणाला लावले त्याअर्थी युधिष्ठीर पण हरेपर्यन्त आपण स्वतंत्र होतो हे उभय पक्षांनी मान्य केलेले आहे. गुलाम माणसाला स्वतंत्र नागरिक पणाला लावता येत नाहीत म्हणून आपण दासी नव्हते हा द्रौपदीचा मुद्दा आहे. जर द्रौपदी दासी असेल तर तिला मिळणारी वागणूक याविषयी तक्रार करता येणार नाही कारण दासांना अब्रू नसते हा त्या सरंजामदारी संस्कृतीचा नियम आहे. द्रौपदीच्या प्रश्नाला अनेक उत्तरे संभवतात. द्रौपदीचा महा उचलन धरून ती दासी नाही असा निर्णय विकर्णाने दिलेला आहे. सर्व पती दास झाल्यानंतर पत्नी स्वतंत्र राहू शकत नाही असाही एक निर्णय आहे. धर्माची गती अत्यंत गहन आहे. पुरुष आपल्या राजकारणाचा गुलाम असतो असा टाळाटाळी करणारा मुद्दा भीष्माचा आहे. दास झालेले पांडव आपले कुणी नव्हते, ते आपले स्वामी व पती नव्हते असे जाहीररीत्या द्रौपदीने म्हणावे व मुक्त व्हावे हा 'पापी' दुर्योधनाचा मुद्दा आहे. खरे म्हणजे द्रौपदीला दूयोधनाने तिच्याच शद्वांत पकडलेले आहे. दास यधिष्ठीर स्वतंत्र द्रौपदीला पणाला लावू शकत नाही या द्रौपदीच्या मुद्याला दास युधिष्ठीर द्रौपदीचा पती राहू शकत नाही ही दुसरी बाजू आहे. एवढे द्रौपदीने म्हणावे हे दुर्योधनाचे म्हणणे आहे.
  सूर्यपुत्राचे या ठिकाणी मत निराळे आहे. कर्णाचे असे मत आहे की. ज्या स्त्रीला एक पती असतो ती कुलस्त्री, जिला दोन पती असतात ती जारिणी आणि पाच पती आहेत ती बंधकी ऊर्फ वेश्या. त्यावेळच्या संस्कृतीत सर्व वेश्या राज्याच्या दासीच आहेत. राजाने त्यांचा भोग घेणे हाच त्यांचा सन्मान. राजा सांगील त्याला भोग देणे हे कर्तव्य. कर्णाला असे म्हणावयाचे आहे की, द्यताची गरजच नाही. पांडव दास झालेले असोत की नसोत द्रोपदी ही वेश्याच आहे. तिला आपण दासी की अदासी हा प्रश्न उपस्थित करता येणार नाही. तिचे लग्न झाले त्या दिवसापासूनच ती वेश्या आहे. कर्णाच्या या भूमिकेनुसार द्रौपदी पांडवांच्या बरोबर वनवासाला जाऊ शकते पण आपल्या चार पतींचा त्याग केल्याशिवाय ती कुलस्त्री होऊ शकत नाही. वृत्तीचा हिडीसपणा याहून निराळा

ओळख

४५