पान:ओळख (Olakh).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टाळ केलेला एक मुद्दा या ठिकाणी नोंदवला पाहिजे. कर्ण हा पहिला पांडव आहे ही गोष्ट निदान चौघांना माहीत आहे. हे चौघेजण म्हणजे कुंती, कृष्ण, विदुर आणि भीष्म. यांपैकी कुणीही हा मुद्दा उपस्थित करून भारतीय युद्ध टाळ शकले असते. उघड्या डोळ्यांनी सर्वांनी संहार पाहिला पण कुणी तोंड उघडून बोलले नाही. संहार तर टाळावा पण तो टळताना यधिष्ठीर राजा व्हावा या प्रेमापोटी सर्वजण गप्प बसलेले आहेत. संहार टळल्यामळे जर दुर्योधन अगर कर्ण राजा होणार असेल तर त्यापेक्षा संहार परवडला असे या चौघांनी मानलेले आहे. आपण पंडूची बाजू न्याय्य मानली, पंडुपुत्रांचा गादीवर अधिकार स्थापन झाला पाहिजे असेही जरी मानले तरी भीष्म आणि विदूर, कृष्ण आणि कुंती यांना पंडुपुत्राचा गादीवर अधिकार स्थापन करावयाचा नाही. या मंडळींना गादीवर युधिष्ठीर अगर सर्वनाश हे दोनच पर्याय दिसतात. उरलेले पर्याय शाब्दिक आहेत. दुर्योधनाचा हट्ट गादीवर मी अथवा सर्वनाश हा आहे. कुरुकुलाच्या प्रचंड संहाराची जवाबदारी या चौघांवर टाकणे भाग आहे. ते या जवाबदारीतून सुटू शकत नाहीत. पैकी श्रीकृष्ण भगवान असल्यामुळे हीच भगवंतांची पुण्यमय इच्छा होती असे कुणी म्हणणार असेल तर प्रश्न निराळा आहे. म्हणून वाद कर्ण सूर्यपुत्र असल्याबद्दल नाही. वाद आहे तो कर्णाच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि मृत्यूबद्दल आहे.
 महाभारत हा जगातल्या वाङमयातील एक अलौकिक ग्रंथ आहे. मानवी जीवनातील सर्व, भव्य, उदात्त, मंगल आणि रमणीय यांच्यासह संपूर्ण मानवी जीवनातील तुच्छ, क्षुद्र, कुरूप, हिडीस आणि वीभत्स या ग्रंथात एकमेकांत पूर्णपणे मिसळून गेलेले आहेत. एकीकडे रौद्र आणि भीषण, दुसरीकडे शांत आणि अदभत यांचेही ताण या कथेत सरमिसळ झालेले आहेत. जीवनाचे इतके विविध अनेक पदरी आणि अनेक पातळीवरचे चित्र एका ग्रंथात सामावले गेल्याचा योग जगाच्या वाङमयात यापूर्वी किवा यानंतर पुन्हा कधी आलेला नाही. महाभारताचे स्वरूप असे संसार वृक्षाप्रमाणे जटिल असल्यामुळे कोणतेही स्पष्टीकरण केले तरी कथेच्या बावतीत ते काही प्रमाणात समर्थनीयच असते. तेव्हा कर्णाची भावना आत्मसमर्पणाची होती ही कल्पना एका मर्यादेत समर्थनीयच मानली पाहिजे. महाभारतातच या कल्पनेचा उदय आहे. उद्योगपति कर्ण श्रीकृष्णाला सांगताना हे सांगतोच की माझ्यापढे मला भयानक विध्वंस आणि पराभव दिसत आहे. एक रणकुंड पेटत आहे. या रणकुंडात सर्वांच्या आहुत्या पडतील तशी माझीही आहुती पडेल आणि युधिष्ठिराचा विजय होईल. कर्णाच्या तोंडी अशी भूमिका चिकित्सक आवृत्तीतसुद्धा शिल्लक आहे. ही भूमिका म्हणजे महाभारताच्या पुनर्लेखनाच्या एका टप्प्यावर निर्माण झालेला कवींचा कल्पना

ओळख

४१