आणि चिकित्सक आवृत्तीत नसला तर म्हणायला पाहिजे ते हे की सतराव्या शतकातील महाभारताच्या अभ्यासकाला हा मुद्दा स्वीकारार्ह वाटला. विसाव्या शतकातील अभ्यासकांना हा मुद्दा प्रक्षिप्त वाटला. यानंतर आपण नीलकंठ आणि सुखठणकर यांच्या अभ्यासपद्धतीची तुलना करू शकतो. त्यावर आपले मत देऊ शकतो. पण या सगळ्या चर्चेत व्यासाचे मनोगत काय हा मुद्दा उपस्थित होण्याचे कारण नाही. आणि व्यासाचे मनोगत काय हे पाहायचे असेल तर त्यासाठी चिकित्सेचा भाबडेपणा उपयोगी नाही. त्याला चिकित्सेचे शास्त्र लागते. विजय देशमुखांच्या लिखाणात कर्णाविषयी प्रेम आहे. ममत्व आहे. मात्र त्यांचा आणि शास्त्राचा कोणताही संबंध नाही इतकेच मला म्हणावयाचे आहे.
भांडारकर संशोधन संस्थेने सिद्ध केलेली महाभारताची चिकित्सक आवृत्ती हे भारतीयांच्या प्रज्ञेचे, परिश्रमाचे आणि चिकाटीचे ज्ञानक्षेत्रातील एक उज्ज्वल ठिकाण आहे. पण या आवृत्तीविषयी मला कितीही ममत्व असले आणि या आवृत्तीचे महत्त्व कितीही मोठे असले तरी तो व्यासांचा शब्द नव्हे हे सर्वांनाच मान्य आहे. डॉ. सुखठणकरांपासून ते डॉ. दांडेकरांपर्यंत अनेक संशोधकांनी परिश्रमपूर्वक ही आवृत्ती सिद्ध केली. या कर्णपर्वाचे संपादक डॉ. प. ल. वैद्य हेही आहेत. पण या मंडळीपैकी कधीच कुणी असे म्हटले नाही की महाभारताची चिकित्सक आवृत्ती हा व्यासाचा शब्द आहे. सुखठणकरांनी ही गोष्ट प्रथमच आग्रहाने मांडलेली होती की आपण सिद्ध करीत असलेले महाभारत हे व्यासाचे महाभारत नव्हे, तसेच ते सौतीचेही महाभारत नव्हे. व्यास आणि सौती यांच्या काळानंतर एक टप्पा सुखठणकर उर-महाभारताचा मानतात. काश्मीरी, उत्तरी आणि दक्षिणी सर्व परंपरांना समान असलेले एक महाभारताचे हस्तलिखित आहे. याला ते उर-महाभारत म्हणतात. आपली आवृत्ती ही उर-महाभारत नव्हे हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सिद्ध झालेली चिकित्सक आवृत्ती ही पाठचिकित्साशास्त्राच्या भूमिकेवर आधारलेली अशी आवृत्ती आहे. या आवृत्तीत सुद्धा अनेक प्रक्षिप्त स्थळे संपादकांना स्पष्ट दिसतात. कर्णपर्वाचे संपादक डॉ. वैद्य यांनी आपल्या प्रस्तावनेत असे म्हटलेलेच आहे की मळ महाभारतातील कर्णपर्वात दुःशासनाचा वध आणि कर्ण-अर्जनाची लढाई व कर्णाचा वध इतकाच भाग असावा. त्याभोवती क्रमाने इतर कथा वाढत गेलेल्या दिसतात. याचा अर्थ हा की मूळच्या महाभारतात वैद्यांच्या मते शेवटच्या चारपाच अध्यायांतील कथाभागच असावेत. अचिकित्सक अशा दक्षिणी प्रतीत कर्णपर्व ११० अध्यायांचे आहे. मुंबई प्रतीत ते ९६ अध्यायांचे म्हणजे १४ अध्यायांनी कमी आहे, चिकित्सक आवृत्तीत ते ६९ अध्यायांचे म्हणजे मुंबई
ओळख
३७