पान:ओळख (Olakh).pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सूर्यपुत्रा' च्या निमित्ताने


 महाभारतातील कर्ण हा नेहमीच अभ्यासकांच्या जिज्ञासेचा विषय राहिला आहे. कर्णाविषयीचे ममत्व ही अर्वाचीनांचीच विशेष पद्धती नसून प्राचीनांना सुद्धा महाभारतातील या व्यक्तीविषयी आकर्षण वाटत असावे असे दिसते. भासासारखा अत्यंत जुना नाटककार जरी घेतला तरी कर्ण हा त्याच्या नाटयकथेचा विषय झालेला आहे. भारतीयांच्या पद्धतीप्रमाणे गंभीर नाटकाचे विषय फक्त महापुरुषच होतात. प्रख्यात, उदात्त महापुरुषांची कहाणी नाटकात असावी हा नाट्यशास्त्रातील आदेश या प्रथेला अनुसरूनच आहे. तेव्हा भासापासून कर्णाविषयीचे ममत्व आपण भारतीय लेखकांत दाखवू शकतो. अशाच ममत्वाचा प्रत्यय मराठी महाभारताची भाषांतरे विशेषतः मोरोपंताचे आर्याभारत वाचताना येतो. कर्ण हा दानशूर, पराक्रमी आणि भक्त या स्वरूपात मोरोपंतांच्या समोर असल्यामुळे त्याचे चित्रण करताना मधून मधून पंताचे मनही उचंबळून येते. आधुनिक काळात परंपरागत मान्यता निर्विवाद राहिलेल्या नाहीत. ज्यांना प्राचीनांनी दुष्ट पुरुप म्हटले ते दुष्ट म्हणून आज मान्य होतीलच असे नाही. हेच सुष्ट नायकांनाही लागू आहे. पण या आधुनिक चिकित्सेच्या काळात कर्णाविषयीचे आकर्षण कमी न होता वाढलेले आहे. वेगवेगळ्या बाजूनी आणि वेगवेगळ्या दृष्टिकोणांनी कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे आकलन करण्याचा प्रयत्न सारखा चालू असतो. अशा या प्रयत्नांपैकीच विजय देशमुख यांनी · सूर्यपुत्र' या ग्रंथांत* केलेला प्रयत्न हा एक आहे असे म्हटले पाहिजे. इतरांनी कर्णाचे जे आकलन केले आहे त्यापेक्षा देशमुखांना काही निराळे म्हणायचे आहे.

* — सूर्यपुत्र ' : विजय देशमुख, हिंदुधर्मसंस्कृती मंदिर प्रकाशन नागपूर,

मूल्य रु. : ८

ओळख-३