पान:ओळख (Olakh).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेव्हा ऋषींना ययातीने तत्त्वज्ञान दिले. व त्यांचे पुण्य घेऊन ययाती पुनः स्वर्गात गेला. हा ययाती उपाख्यानाचा उत्तर भाग आहे. तिथे ययाती ऋषींनाही ज्ञान देणारा अधिकारी पुरुष मानलेला आहे. महाभारतात असणारी ययातीची कहाणी ही अशा पुण्यवान पूर्वजाची कथा आहे. जो ब्रह्मचर्यात असताना वेदज्ञ व पराक्रमी झाला, ज्याने गहस्थाश्रमात धर्माचे पालन निष्ठेने केले व धर्म-अविरुद्ध अर्थ व काम पुरुषार्थ पूर्ण करून त्रिवर्ग-प्रतिपत्ती केली. वानप्रस्थात तप केले व उग्र तप करून पुण्य मिळविले, असा हा स्वर्गाचा निरंतर अधिकारी शुभपुरुष आहे.
 ह्या ययातीला भोगाचे प्रतीक समजणे व त्याला अनुसरून त्याच्या जीवनाचा अन्वयार्थ लावणे म्हणजे ययातीचे दुर्दैव नव्हे काय ? ह्या अर्थाने ययाती दुर्दैवी आहे खराच. जी देवयानी सर्वस्वाने त्याला अनुसरली व सुख तर तिने दिलेच पण तपातही जी पतीसह सहभागी राहिली तिच्याशी ययातीचा संसार सुखाचा झाला नाही, असे समजण्यात देवयानीचीही अवहेलना नाही काय ? ज्या कचाने संजीवनी मिळाल्यानंतर पुन्हा मत्युलोकाचे तोंडही पाहिले नाही, त्याला मानवजातीचा उद्धारकर्ता मानणे म्हणजे अनाठायी श्रेय देणे नव्हे काय ? पण त्याला इलाज नाही. ह्या अपार काव्य संसारात कवी हा एकमेव प्रजापती असतो. त्याच्या सष्टीला पुराणेतिहासापेक्ष निराळेच मानले पाहिजे असे आनंदवर्धनच वोलन बसला आहे.