पान:ओळख (Olakh).pdf/38

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनाचे समाधान झालेले नाही. म्हणून मला पुत्राने तारुण्य द्यावे. ययातीचे स्पष्टीकरण असे आहे की मी अनेक यज्ञ केले, त्यामुळे व्रतस्थ राहण्यात फार काळ गेला म्हणून मी भोगतृप्त होऊ शकलेलो नाही. (१।७० । ३८). ह्या ययातीला तृप्त होण्यासाठी अजून हजार वर्षे तारुण्य हवे आहे. (१।७९ । ४,९, १६, २०, २६). म्हणजे वार्धक्यापूर्वीच्या काळातही ययाती धर्मनिष्ठच होता. पुरूने ययातीला तारुण्य दिले. हे तारुण्य घेऊन हजार वर्षे ययाती सुख भोगीत राहिला. ह्या सुख-भोगाचे स्वरूप काय आहे ? राजा ययाती एक राजा आहे. सांसारिक व गहस्थधर्मी पुरुष आहे. म्हणन त्या हजार वर्षाच्या भोगाचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. आपल्यासमोर जे भोगलंपटतेचे स्वरूप आहे, त्याहून हा भोग निराळा आहे. चार पुरुषार्थांच्या पैकी हा काळ म्हणजे त्रिवर्ग प्रतिपत्तीचा म्हणजे तीन पुरुषार्थ पार पाडण्याचा. ह्यात एक पुरुषार्थ काम आहे. कामसुख देण्यास देवयानी होतीच व ती तत्पर पत्नी होती. पुत्रांना शाप मिळाला म्हणून ती पतीवर चिडलेली नाही. तिने पतीसह आनंदाने संसार केला. शिवाय मिष्ठा होती. तिलाही पुत्र म्हातारा झाल्याचे दुःख नाही. परंपरेनुसार ऐश्वर्यमान राजासाठी अप्सरांचा भोग हवा, म्हणून क्षेपक भागात विश्वाची व गौ ह्या दोन अप्सरांचाही उल्लेख आहे. ह्यांच्यासह हजार वर्षे ययाती भरपूर कामसुख घेत होता. पण ही भोगलंपटता नव्हे कारण महाभारतात या घटनेचे वर्णन धर्माविरुद्ध भोग असे केले आहे. शिवाय त्या काळात ययाती धर्मपूर्वक प्रजानुरंजन करीत होता. त्याने विश्वपालन म्हणजे प्रदेश रक्षण केले, चोरांचा बंदोवस्त केला, युद्धे जिंकली, राज्य वैभवाला नेले, दीनांवर अनुग्रह केला, अतिथी पालन केले, राजा म्हणून असणारे कर्तव्य व अर्थपुरुषार्थाचे पालन तो उज्ज्वल यशासह करीत होता. त्याने अनेक यज्ञ केले, देवतांचे तर्पण केले व श्राद्ध करून पितरांचेही तर्पण केले. म्हणजे धर्म पुरुषार्थही पूर्ण केला (११८२।२ ते ६) म्हणजे याही काळात ययाती भोगलंपट नव्हताच.

 कालाची गणना ययातीच करीत होता. हजार वर्षाने त्याने स्वतःच हे जाणले की कामाने काम तृप्त होत नसतो. त्याने पुरूला राज्य दिले आणि स्वतः उभय भार्यासह तपासाठी तो बाहेर पडला. शर्मिष्ठेसह देवयानीने त्याला इथेही साथ दिली. ययातीसारखा राजा भोगलंपट नसतो. त्याच्यासारख्या वेदज्ञाला इतरांच्या उपदेशाची गरजही नसते. तपासाठी वाहेर पडलेल्या ययातीने वानप्रस्थ स्वीकारला (१। ८१ । १). तप करून प्रचंड पुण्य संपादिले व त्यानंतर सर्वप्रकारचे तपाचरण करून पुण्यसमृद्ध झालेला ययाती स्वर्गात गेला व इंद्राच्या अर्ध्या असनाचा अधिकारी झाला. इंद्राने मत्सराने ग्रस्त होऊन ययातीचा तपोनाश घडविला व ययातीचे स्वर्गातून पतन झाले.

ओळख

२९