पान:ओळख (Olakh).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



त्यात खांडेकर हे एक मानावे लागतील. म्हणूनच त्यांनी भोग विरुद्ध त्याग असा संघर्ष मान्य केलेला नाही. खांडेकरांसाठी भोग विरुद्ध त्याग हा दोन असत्यांमधील झगडा आहे. ह्यांपैकी कुणाचा तरी जय झाला असे आपणास वाटले, तरी तो एक भ्रमच ठरणार आहे. ह्या नाशिवंत अकल्याणकारी आभासाला कवटाळण्यास ते कधीच तयार झाले नसते. प्राचीनांना भोगाची व्यर्थता दाखविणे पुरेसे वाटत आले. खांडेकरांना त्यागाचीही व्यर्थता दाखविणे आवश्यक वाटले. कारण त्याग आणि भोग व्यक्तींच्या जीवनात परस्परविरोधी असले, तरी समह-जीवनात त्यांचे साहचर्य चालच असते. खरे तर असे आहे की काहींना आपला भोग अबाधित ठेवायचा असेल, तर त्यांना इतरांसमोर त्यागाच्या महतीचे नगारे वाजविणे भाग असते.

 खांडेकर हे विसाव्या शतकातील, समाजवादी फ्राईड आणि मार्क्स या दोन प्रभावी विवेचकांनी प्रभावित केलेल्या विचारविश्वात रमणारे व त्यात सुसंगती मानणारे असे त्यांचे मन. फ्राईड कामाचे मोठेपण सांगतो, मार्क्स क्षुधेचे मोठेपण सांगतो. आपल्या परंपरागत व तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत सांगायचे तर फ्राईड आणि मार्क्स दोघे मिळन प्रकृती हे एक न नाकारता येणारे सत्य आहे, असे सांगत आहेत. खांडेकर प्रकृती सत्य आहे हे नाकारू शकत नव्हते जे ब्रह्म आणि आत्मा यांचे अद्वैत मानत होते व आत्मा तेवढा सत्य मानत होते, त्यांच्यासाठी खरोखरी नसणारी पण अज्ञानामुळे जाणवणारी प्रकृती ही एक महान अवस्तू' होती. प्रकृतीला अवस्तू मानणारेच फक्त भोग विरुद्ध त्याग हा संघर्ष खरा मानू शकतात. त्यांच्यासाठी भोग-वैराग्य-त्याग-मोक्ष असा क्रमसमुच्चय असतो. शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्याचा आरंभ यामळे इहामत्रफलभोगवैराग्यापासून होतो. खांडेकरांसाठी प्रकृती सत्य होती व आहे. कारण ते मूलत: जडवादी आहेत. खांडेकरांनी प्रथमतः ययातीच्या कथेची मांडणी विसाव्या शतकातील जडवाद्यांप्रमाणे केली. त्यांना त्याग हा अकल्याणकारी आहे. विपरीत आहे, म्हणन विकृतीला जन्म देणारा आहे, असे म्हणायचे आहे. खांडेकरांना एक त्यागाचा प्रतिनिधी कथानकात घेणे भाग होते. प्राचीनांना त्याची गरज नव्हती. महाभारतातच ययातीला यती नावाचा एक भाऊ असल्याचा उल्लेख आहे. शंतनूचा वडील भाऊ देवापी राज्यत्याग करून ऋषी झाला. महाभारतातील क्रमानुसार अनुमान हे की, यती हा ययातीचा वडील भाऊ. मग ययाती राजा कसा झाला असावा? यतीने राज्यत्याग केल्यामुळे ! यतीने राज्यत्याग का केला असावा ? मोक्षसाधनेसाठी. महाभारतातील प्रक्षेपाचा आधार, यती मुनी झाला ह्या अनुमानासाठी आहे. खांडेकरांनी महाभारतातील हा यती उचलला आणि त्यागाच्या भूमिकेची व्यर्थता सांगण्यासाठी विकसित केला.

ओळख

२१