Jump to content

पान:ओळख (Olakh).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वास्तव नसतातच. स्वप्ने वास्तववादी ठेवण्याचा आग्रह करणे खुळेपणाचे ठरेल. वास्तववादी नसणे हा स्वप्नांचा दोष नसून गण असतो. जो कादंबरीकार पिढया पिढया पुरतील अशी स्वप्ने समाजाला देतो त्याच्या वाङमयाचे स्वरूप पाहाताना हा स्वप्ने देणारा लेखक असे गृहीत धरून आपण त्याचा विचार करणार की नाही ? जीवन विविध आहे त्याच्या गरजाही अनेक पदरी असणार. ह्या जीवनाला जशी वास्तवाची जाण हवी, तशी स्वप्नांचीही जाण हवी. स्वप्नांचा विचार वास्तवाच्या पातळीवरून करणे म्हणजे मोराच्या पिसान्याला उडणा-या गरुडाच्या पंखाचा आकार नाही म्हणून दोष देणे किंवा गरुडाच्या पंखालाः चालणा-या बैलाच्या पायाप्रमाणे खर नाही म्हणून दोष देणे ही गोष्ट हास्यस्पद आहे. समजायला उशीर लागतो पण ही बाब समजून घेतली पाहिजे. आणिः समीक्षकांनी पाहिजे तर काहीच समजून घेऊ नये. कारण खांडेकर व त्यांचे वाचक ह्या दोघांनीही समीक्षक काय म्हणतात ह्याचा कधी विचारच केलेला नाही.