खुपण्याजोगे असतात. अगदी स्थूल बुद्धीच्या माणसालासुद्धा प्रथमदर्शनीच हे दोष दिसतात. त्यांची लांब व रुंद यादी करता येते पण असे दिसते की इतके उघड दोष असणारा लेखक पिढ्यानपिढ्या टिकून असतो. प्रत्येक पिढीत त्याचा नवा वाचकवर्ग निर्माण झालेला दिसतो. उघडच आहे की लेखक आणि त्याचे लिखाण दोषामुळे टिकत नाही. दोषांवर मात करणारे, ह्या दोषांची उपेक्षा करण्यास भाग पाडणारे काही गुण ह्या लेखकांजवळ असतात. हे गुण चटकन जाणवण्याजोगे नसतात पण त्यांचा वाचकांवर प्रभाव व परिणाम दिसत असतो. प्राचीन मराठी वाङमयात मोरोपंत हे असे कवी आहेत की प्रत्यक्ष केशवसुतांनाच त्यांचे अनुकरण करण्याची इच्छा झाली होती. केशवसुतांचे मत असे की गेल्या शंभर वर्षात मोरोपंतांच्या एवढा मोठा कवी झालेला नाही. आधुनिक मराठी वाङमयात गडकरी हे असे नाटककार आहेत. नवकथेच्या प्रवर्तकाला- गंगाधर गाडगीळांना- गडकरी हा मराठी साहित्याचा मानदंड आहे, असे म्हणावेसे वाटले. मोरोपंत कवीच नाहीत असे म्हणणाऱ्या पिढया उलटल्या. हे सांगूनही आता १०० वर्षे झाली, अजून मोरोपंत कवी म्हणून उभा आहे. खांडेकरांचीही जात तीच आहे. गेली पंचेचाळीस वर्षे हा कृत्रिम लेखक आहे हे सांगण्यात गेली. आणि आता इतक्या वर्षांनंतर पाहावे तो हा कादंबरीकार ज्ञानपीठाचा मानकरी झालेला. अशा लेखकांची सामर्थ्यस्थाने शोधणे हे समीक्षकांचे खरे काम असते. या लेखकांजवळ असे काय आहे की ज्यामुळे त्यांचे दोष क्षम्य ठरले? या प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यात समीक्षेची गुणग्राहक मार्मिकता असते.
आज या क्षणी खांडेकरांच्या वाङमयावर प्रेम करणाऱ्या सर्व वाचकांच्या मनात आनंदाचा उल्हास जागा झालेला असणार. एखादे वाङमयीन विवेचन करण्याचा हा क्षण नाही. ती माझीही इच्छा नाही पण जाता जाता दोन बाबी सांगितल्या पाहिजेतच. प्रथम म्हणजे ही की ययातीमुळे मराठीत पौराणिक कादंवरीची एक नवी परंपरा अस्तित्वात आलेली आहे. शिवाजी सावंतांची 'मृत्युंजय' आणि रणजित देसाईंच 'राधेय' ह्या दोनच कादंबऱ्या मला अभिप्रेत नाहीत. माडखोलकर त्यांची 'जन्म दुर्दैवी' व 'रेणुका', आनंद साधल्यांची 'वैदेही' व 'अंजनीचा सूत', परांजपे ह्यांची 'युगावेगळा' अशा अनेक कादंबऱ्या माझ्यासमोर आहेत. शिरवाडकरांसारख्या ज्येष्ठ कवी-नाटककाराससुद्धा ययातीचे जीवन नाटकासाठी घ्यावेसे वाटले. ययातीने एक परंपरा व प्रवाह निर्माण केला आहे. वाङमयात परंपरा व प्रवाह निर्माण करण्याचा योग ज्या लेखकांना येतो त्याचा विचार आपण कोणत्या पद्धतीने करणार आहो असाही एक प्रश्न आहे. ह्याचा विचार व्हायला हवा. दुसरी बाब ही की जीवनात स्वप्नाचे महत्त्व आपण कोणते मानणार आहोत? स्वप्ने कधी