पान:ओळख (Olakh).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषेत हे अनेकवचनी रूप गय्या असे होते. गया गोपीका हे मूळ शद्व हिंदी असून त्यांचा मराठी अर्थ गायी गोपींचा असाच होतो हे दाखविण्यात माझा हेतू शेजारच्या भाषांमधील शद्वांची रूपे लोकगीतांत कशी येतात इकडे लक्ष वेधण्याचा आहे. कारण ह्या गीतांचे शब्द तपासणे हे नुसते भाषेच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून आज विस्मृत झालेल्या या गीताशी संबंधित असलेल्या विधींचा शोध घेण्याचेसुद्धा महत्त्वाचे आहे असे मला वाटते.
 मांडे यांची विवेचकता लोकसाहित्यापूरती मर्यादित कधीच राहत नाही. ती इतरही अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकू लागते. या दृष्टीने त्यांचे विधिनाट्य हे प्रकरण पाहण्याजोगे आहे. आपण सामान्यपणे असे गृहीत धरतो की एखादी भूमिका करणारा नट सोंग घतो, म्हणजे पितांबर नेसून मुकूट घालून नट रामाचा अभिनय करू लागतो. लोकनाट्यात ही कल्पना थोडी निराळी आहे. ( ह्या ठिकाणी लोकनाटय हा शब्द परंपरागत विधिनाटय या अर्थाने समजून घ्यायचा. ) या ठिकाणी व्यक्तीत देवतेचा संचार होतो आणि प्रेक्षक देवता म्हणूनच अनुभव घेतात. भरत नाट्यशास्त्रात ही कल्पना आलेली आहे. व्यक्तीत देवतेचा संचार होणे आणि प्रेक्षकांनी व्यक्तीला देवताच मानणे ही क्रिया नटाने अभिनय करण्यापेक्षा निराळी आहे. या नाटयाची विविधरूपे लोकसमूहात कशी अभिनीत होतात याविषयी तपशिलवार विवेचन करून मांडे जेव्हा असे सांगतात की मराठी नाटकाचा उगम शोधताना कानडी भागवत नाटकामध्ये किंवा कोकणातील दशावतारामध्ये शोधणे अपूर्ण आहे. तो उगम प्रचलित विधिनाटयामध्ये सुद्धा शोधला गेला पाहिजे. कारण सतराव्या शतकातील रणभीर या शाहिराची अनेक गीते या नाट्याच्या संदर्भात निर्माण झालेली आहेत. आपण जर आरंभीच्या मराठी नाटकांच्या प्रयोगांची तपासणी करू लागलो तर त्या प्रयोगात विधिनाटयातून अनेक घटक दिसतात हे मांडे यांचे म्हणणे खरेच आहे.

 एका विशिष्ट दृष्टिकोणातून लोकसाहित्याची संगती लावण्याचा मांडे यांचा हा प्रयत्न मराठी लोकसाहित्याच्या विवेचनात मोलाची व नवीन भर घालणारा आहे यात वाद नाही. पण अशा कोणत्याही विवेचनातील प्रत्येक ठिकाण सर्वांना पटावे अशी अपेक्षा करणे च कीचे ठरेल. काही ठिकाणी वाद शब्दावर. पृष्ठ २१ वर मांडे यांनी गोंधळातील एक शेवटचे ठिकाण उल्लेखिलेले आहे. सगळे देव रंगात आले, रंग घेऊन आपल्या संतांत गेले असा हा उल्लेख आहे. मांडे यांनी संताच्या पूढे प्रश्नचिन्ह टाकलेले आहे. त्यांना म्हणायचे आहे की या ठिकाणो अर्थ लागत नाही. माझ्यासारख्याला अर्थ सरळ लागतो. एकेका देवतेच्या उपासकाला भगत, संत अशी नावे आहेत. या

१३८

ओळख