पान:ओळख (Olakh).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सीतेला सख्खी सासू नाही. .( वाल्मिकी रामायणाप्रमाणे सीतेला एक सख्खी सासू व दोन सावन सासवा आहेत.) अजून एक कल्पना अशी आहे की माहेरी पाठविण्याचे निमित्त करून रामाने लक्ष्मणाच्या हातून तिचा वध करविला. एक कल्पना अशी आहे की, सीता प्रसूत होताना तिला गायीने मदत केली. स्त्रीगीतांमधून अशा नानाविध कल्पना पसरलेल्या आहेत. या कल्पनांची समाजजीवनाच्या संदर्भात नानाविध प्रकारची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. एक तर स्त्रिया सीता ही आपले प्रतीक मानतात आणि म्हणून सीतेचे निमित्त करून स्वतःच्या जीवनाची कहाणी सांगतात. के. नांदापूरकरांनी स्त्रीगीतांतून रामायण सिद्ध करण्याचा एक प्रयत्न करून पाहिला होता. त्यांना सापडलेल्या ओवीत एक ओवी अशी होती की, रामाची इच्छा नसताना आईच्या आग्रहामुळे रामाला सीता वनवासात पाठवावी लागली. पण सीतेवर रामाचे प्रेम असल्यामुळे तिला वनवासात पाठविताना, तिच्या चरितार्थाची सोय म्हणन, आईला चोरून रामाने आपली अंगठी तिला दिली व आपण आठपंधरा दिवसाला जंगलात येऊन भेट असे आश्वासन दिले. हे उघड आहे की, या ठिकाणी सीतेचे निमित्त करून स्त्रिया स्वतःच्या जीवनाची कहाणी सांगतात. काही ओव्या या प्रकारच्या आहेत. महादेव हा नवऱ्याचे प्रतीक मानला जातो. म्हणून स्त्रिया महादेवाचे निमित्त करून आपल्याच नवऱ्याची हकीकत पुष्कळदा सांगत असतात. भमिकन्या सीता हिचे एक रूप शेतीची देवता म्हणन आहे. या कृषिदेवदेवतेविषयीच्या समजुती आणि कहाण्या रामायण कथेत मिसळलेल्या अनेकदा दिसतात. याहून निराळे असे लोकसमजुतीतले रामायण आहे. म्हणजे रामायणकथेत अर्वाचीन काळात काही ठिकाणी ओव्या करणा-या स्त्रीने आपले चित्र पाहिले आहे. काही ठिकाणी शिष्टसंस्कृतीतील रामकथा रूपांतरित होऊन झिरपलेली आहे. हे दोन थर वाजूला काढल्यानंतर सीता या कृषिदेवतेशी निगडीत असणान्या म्हणजेच तिला मानवाची आदिमाता समजणान्या जेवढया ओव्या सापडतील, त्या सकेताचा शोध आपण घेतला पाहिजे.

 लोकमानस हे परंपरांचे बनलेले असते हे खरेच आहे. पण काही परंपरा हजारो वर्ष जुन्या असतात, काही केवळ शतकांच्याच असतात. हे सर्व थर नीट तपासून पाहून संगती लावणे हे कठीण काम आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, लहान मुलांच्या खेळात एक गीत आहे. या गीताचा शेवटचा चरण मांडे 'गाई गोपीचा उतरला राजा' असा घेतात. माझ्या आठवणीत शब्दरचना अशी : अरिंग मिरिंग लौंगा तिरिंग, लवंगा तिरचा डबडब बाजा, गया गोपीका उतरला राजा.' मला असे दिसते की, हा कोणत्या तरी वैष्णव गीताचा अवशेष आहे. गाय या एक वचनाचे आपण मराठीत गायी असे अनेक वचन करतो. पण हिंदी बोली

१३६

ओळख