पान:ओळख (Olakh).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेच नाही. जिथे उत्कटतेने कोणते नाट्य निर्माणच होत नाही तिथे काही कोसळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. पण ज्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो त्या ठिकाणी देवल, खाडिलकरांचे नाटक शेवटाला कोसळणारे नाटक आहे ही गोष्ट समजून घ्यावी लागते. 'भाउबंदकी' सारख्या नाटकात खाडिलकरांना संघर्षच हेरता येऊ नये ही गोष्ट त्यांच्या नाटयविषयक उपजत जाणिवेविषयी फारसे अनुकूल मत निर्माण करणारी नाही. खाडिलकरांनी एकूण १५ नाटके लिहिली. या १५ नाटकांत यशस्वी किती झाली हा प्रश्न बाजूला ठेवला तरी संघर्ष बिंदू नीट हेरून नाटयाची मांडणी करणे त्यांना किती वेळा जमले आणि किती वेळा जमले नाही याचीही मोजदाद एकदा केली पाहिजे. 'भाऊबंदको' सारख्या नाटकात एका बाजूला आनंदीवाई आणि राघोबा आणि दुसन्या वाजला सखाराम बापू, नाना फडणवीस आणि रामशास्त्री असे दोन गट आहेत. या नाटकापुरते म्हणायचे तर नाना आणि बापू याच्यांत काही कर्तत्वच नाही. राघोबाला पेशवा होण्यास अडथळा करण्याइतके यांच्यात धैर्य नाही. पापाला वाचा फुटेल त्या दिवसाची वाट पाहाणारी ही सगळी मंडळी, ज्या दिवशी रामशास्त्री राघोबाला देहान्त प्रायश्चित्त फर्मावतो त्यानंतरसुद्धा सेना अगर सरदार जमा करून हे रोघोबाविरुद्ध उठाव करीत नाहीत; तो पुण्यातून बाहेर जाण्याची ते वाट पाहात बसतात. इकडे राघोबा पुनःपुन्हा आनंदीसमोर नमताना दिसतो. मग या नाटयाची उभारणी आनंदी विरोधी रामशास्त्री अशी व्हावयाला नको होती काय ? पण सर्व नाटकभर आपला प्रमुख अडथळा म्हणून रामशास्त्र्यांवर मात करण्याच्या प्रयत्नात आनंदीवाई दिसत नाही किंवा रामशास्त्र्याने देहान्ताची शिक्षा दिल्यानंतर आपल्या वाजूचे लोक गोळा करून प्रतिकाराला सज्ज होतानाही ती दिसत नाही. स्वतः रामशास्त्रीसुद्धा देहान्त प्रायश्चित्त कर्मावणारे व्याख्यान देऊन जो निघून जातो तो परत आशीर्वाद देण्यासाठीच येतो. राघोबाचा पाडाव करण्यासाठी रामशास्त्र्यांनी काही केले आहे काय? याचेही उत्तर 'नाही' असेच आहे. म्हणजे या नाटकाच्या मांडणीत संघर्षाची नीट मांडणीच नाही. अशी या नाटयाची सगळी बैठक कोसळून पडणारी आहे. जी गोष्ट 'भाऊबंदकी' बावत तीच कीचक वध आणि स्वयंवर वजा जाता खाडिलकरांच्या उरलेल्या सर्व गंभीर नाटकांबाबत म्हणता येईल.

  खाडिलकरांच्या प्रकृतीचे वैशिष्ट्य म्हणून वा. ल. विचारनाट्याचा उल्लेख सतत करीत असतात. अतिशय प्रभावी व ठसकेबाज व्याख्याने खाडिलकरांच्या नाटकात आहेत, या गोष्टीवर दुमत असण्याचे कारण नाही. पण या प्रभावी आणि ठसकेबाज व्याख्यानांनीच खाडिलकरांच्या नाटकांतील सारे

१.२६

ओळख