पान:ओळख (Olakh).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मर्मग्राही झाले आहे असे मला वाटते. जीवनवादी समीक्षा म्हणजे बोधवादी समीक्षा, उपयुक्तवादी समीक्षा नव्हे हे मान्य करून खन्या जीवनवादी समीक्षेची आपण पाहणी करू लागलो व तंत्रवाद आणि मनोरंजन म्हणजे कलावाद नव्हे हे समजून घेऊन शुद्ध कलावादी भूमिकेकडे आपण वळलो तर या दोन्ही दष्टिकोणात थोडीशी तफावत असली तरी प्रत्यक्ष रसग्रहणात, आस्वादात हे अंतर अगदी पुसट होऊन जाते. कलावादी आणि जीवनवादी समीक्षेतील हा फरक जवळ जवळ पुसट झाल्याचा अनुभव वीस वर्षांपूर्वी केलेले वामन मल्हारांचे विवेचन आणि आज त्यांनी केलेले खाडिलकरांचे विवेचन दोन्ही ठिकाणी सारखाच जाणवतो
 ऐतिहासिक नाटकांकडे वा. ल. वळले का लगेच ऐतिहासिक नाटकात नवनिर्मिती कितपत शक्य आहे या प्रश्नाचा विचार ते करू लागतात. ही नवनिर्मिती इतिहासाने पुरवलेली माहिती टाळून करता येईल काय ? वा. लं. ना. असे वाटते. पण असे करता येणार नाही. ऐतिहासिक नाटक किंवा ऐतिहासिक कादंबरीचा आधार काल्पनिक नसतो. इतिहास आपल्यासमोर काही तपशील व दुवे मांडून ठेवतो. हे सर्व तपशील ज्यात सुसंगतपणे एकवटू शकतील अशी व्यक्तिरेखा सिद्ध करण्याचे काम कलावंताचे आहे. त्यात अमूक प्रसग इतिहासाने सिद्ध केलेला, अगर तमुक प्रसंग इतिहासात न नोंदवलेल्या या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नाहीत. महत्त्वाची असते सर्व ऐतिहासिक वास्तवाला जिवंत करकरणारी व्यक्तिरेखा. ऐतिहासिक कलाकृतीत काल्पनिकाचे प्रमुख कार्य हे असे असते. या ठिकाणी काल्पनिक माहितीच्या थरावर असणा-या ऐतिहासिक वास्तवाला अनुभवाच्या मूल्यमापनात वा. लं. नी स्वीकारलेला हा दष्टिकोण पुन्हा त्यांच्या एकण मीमांसेशी मिळताजुळताच आहे. सामाजिक वाङमयकृतीला जर सामाजिक वास्तवाचा आधार लागत असेल तर ऐतिहासिक वाङमयकृतीला इतिहासकालीन वास्तवाचा आधार सोडून चालणार नाही.

 म्हणूनच खाडिलकरांनी 'सवाई माधवरावचा मृत्यू' या नाटकात निर्माण केलेल्या केशवशास्त्री या पात्रावर त्यांचा आक्षेप आहे. शेक्सपिअरचा हॅम्लेट आणि त्याचा यागो एका नाटकात आणल्याबद्दलची स्तुती पुष्कळ करून झाली आहे. या घटनेचे कौतुक वा. ल. करू शकत नाहीत. केशवशास्त्री हे पात्र निर्माण केल्यामुळे नाटयाचे ऐतिहासिकत्व विटाळले गेले. नाना फडणिसांच्या माथी हतबल राजकारण व निष्काळजीपणा आणि कर्तृत्वशून्यता हा डाग विनाकारण बसला व केशवशास्त्र्यांच्या नानाविध लीलांनी सारे नाटक डागाळन गेले, त्याची एकात्मता ढासाळली असे वा. लं. ना वाटते. केशवशास्त्री या

ओळख

१२३