पान:ओळख (Olakh).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उरकल्याप्रमाणे उरकली जाते. म्हणून नाटकाचा शेवटचा परिणाम म्हणून केवळ रसभंग करणारा नाही, तर संपूर्ण नाटकाला रसशून्य करणारा आहे. स्वभावरेखनावर आत्यंतिक भर देणारी वा. लं. ची ही विवेचनपद्धती विद्याहरणा' च्या बाबतीत पुन्हा सर्वसामान्य समजती विरोधी निर्णय देऊन बसली आहे.
 विद्याहरण' चे वा. लं. नी केलेले मूल्यमापन हेही मला महत्त्वाचे वाटते. मात्र ते वा. लं. च्या शुद्ध कलावादी वाङमयीन भूमिकेत कुठवर सामावून जाते याविषयी मला शंका आहे. ज्यावेळी आपण उत्कट प्रेम करणान्या देवयानीच्या दारुण प्रेमभंग दाखवण्याची जवाबदारी नाटककारावर टाकतो, त्यावेळी नाटकात देवयानी आणि कच यांचे स्थान पाहण्याऐवजी आपण त्या घटनेची वास्तविक जीवनातील गंभीरता विचारात घेत असतो. खाडिलकरांनी या नाटकात कच-देवयानीचा अनावश्यक विस्तार केला, अस्वाभाविक कलाटणी दिली हे म्हणणे निराळे, कारण हे म्हणणे त्या कलाकृतीच्या चौकटीच्या संद र्भात असते. आणि देवयानीचा दारुण प्रेमभंग दाखवायलाच हवा होता हे म्हणणे निराळे. कारण तिथे आपण जीवनाशी संगती शोधीत असतो. शुक्राचार्य जोपर्यंत आदरणीय होत नाही तोपर्यंत त्याचे पतन शोकात्म होणे शक्य नाही हे म्हणणे निराळे. आणि शुक्राचार्यांच्या स्वभावरेखेचे निमित्त करून दैवी संपत्तीविरुद्ध असुरी संपत्ती हा संघर्ष रंगविण्याची संधी खाडिलकरांनी टाळली हे म्हणणे निराळे. कारण या दुसन्या ठिकाणी आपण कचविरोधी शुक्राचार्य, देव विरोधी दानव, दैवी संपत्तीविरुद्ध असुरी संपत्ती हा संघर्ष नाटककाराने रंगविणे आवश्यक होते असे सांगून, पुन्हा एकदा जीवनाचा संदर्भ देत असतो. वा. लं. च्या शुद्ध कलावादी भूमिकेला जीवनाच्या व्यापक आणि खोल आकलनाची पार्श्वभमी सदैव आढळते तशी याही ठिकाणी आहे. श्रेष्ठ कलाकृतीत जीवनाचे व्यापक व खोल आकलन असलेच पाहिजे हा वा. लं. चा आग्रह मला बरोबर वाटतो. मात्र हा आग्रह त्यांच्या शुद्ध कलावादी भूमिकेत चपखल बसणारा आहे की माझ्यासारख्या जीवनवादी भूमिकेचा सांधा न तोडणान्याच्या विचारात हा आग्रह चपखल बसणारा आहे याविषयी मी साशंक आहे.

 विद्याहरणावरचीच नव्हे तर वा. लं. ची कोणतीही समीक्षा वाचताना ही गोष्ट मला सारखी जाणवत आली आहे. वास्तविक जीवनाच्या संगतीतून, आकलन व अवलोकनातून वाङमयाचे सामर्थ्य वाढते. वाङमयात असणाराजिवंतपणा हा जीवनातून व त्याच्या निकट साहचर्यामळे वाङमयात अवतीर्ण होत असतो आणि श्रेष्ठ वाङमयकृतीच्या संपर्कात असताना कलेपेक्षा जीवनाचे भान आपणाला अधिक होते ही वा. लं. ची भूमिका मला रास्त वाटते. या भूमिकेतून त्यांनी केलेले रसग्रहण ठिकठिकाणी अतिशय मामिक आणि

१२२

ओळख