पान:ओळख (Olakh).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाटककार खाडिलकर *



 वामन मल्हारांनंतर खाडिलकर हा लेखक वा. ल. कुलकर्णी यांच्या प्रकृतीशी मिळता जुळता भेटलेला दिसतो. वाङमयाच्या क्षेत्रात काही लेखकच असे असतात की, ज्यांचे मोठेपण, वाङमयेतिहासाच्या संदर्भात, वाङमयीन प्रवाहावर त्या लेखकांनी केलेल्या व त्या लेखकांच्या अभावितपणे पडलेल्या प्रभावातच शोधावयाचे. याऐवजो जर त्या लेखकांचा अभ्यास सरळ एक प्रतिभावंत म्हणून आपण करू लागलो तर सुतराम फारसे काही पदरात पड़ण्याचा संभव नसतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे असे लेखक होते. श्रीपादकृष्णांच्या नाटकात आजच्या रसिकाला मोह घालण्याजोगे अगर त्यांच्या टीकेत आजच्या टीकाकाराला लक्षणीय वाटण्याजोगे फारसे नाही. टीकाकार म्हणन कोल्हटकरांचे मोठेपण, त्यांच्या आधीची मराठी टीका आणि त्यांच्या नंतरच्या मराठी टीकेवर, त्यांचा घडलेला परिणाम या स्वरूपात शोधावे लागते. टीकाच म्हणन नव्हे तर कोल्हटकरांची नाटके व विनोद यांचेही स्वरूप पुष्कळसे असेच आहे. कोल्हटकरांनी गडकरी, वरेरकरांना काय दिले हे पाहूनच कोल्हटकरांचे मोठेपण व मर्यादा ओळखता येतात. पण काही लेखक ह्यापेक्षा निराळे असतात. त्यांचा मोठेपणा स्वयंभू असतो. तेही आपल्या काळाच्या चौकटीत उभे असतात.

* ' नाटककार खाडिलकर' ले० वा. ल. कुळकर्णी. प्रकाशक पॉप्युलर प्रकाशन, मुंबई ७. मूल्य ७ रु.
११४

ओळख