पान:ओळख (Olakh).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाटणकर असे नोंदवितात की, अशा प्रकारचे विवेचनाचे गट पडतात याचे कारण ही कल्पना द्विध्रुवात्मक आहे हे आहे. वाङमयासारख्या कलेत लौकिकतावाद जास्त प्रभावी वाटतो. संगीतासारख्या कलेत अलौकिकतावाद जास्त प्रभावी वाटतो. पाटणकरांनी ही विभागणी करताना आस्वादातील उत्स्फर्त प्रतिक्रियांचा आधार मान्य केला आहे. कलाकृतींचा आस्वाद घेताना ज्या उत्स्फूर्त प्रक्रिया येतात त्यांच्यातील द्वंद्वे अनेक आहेत. ती लौकिकता आणि अलौकिकता याच पातळीवरील नाहीत. प्रत्येक कलाकृतीच्या रूपाने साहित्यक्षेत्रातील परंपराही जाणवत असतात आणि प्रत्येक कलाकृतीची नवताही जाणवत असते. म्हणून लौकिक विरुद्ध अलौकिक या द्वंद्वाप्रमाणेच परंपरा विरुद्ध नवता हेही एक द्वंद्व आहे. सौंदर्य वस्तुनिष्ठ मानायचे की आत्मनिष्ठ मानायचे, यावरही एक द्वंद्व आहे. कलांचा विचार करताना अशी अनेक द्वंद्वे समोर येतात. कलावाद विरोधी जीवनवाद, लौकिकतावाद विरोधी अलौकिकतावाद, अपूर्वता विरोधी परंपरा, वस्तुनिष्ठा विरुद्ध आत्मनिष्ठा, आस्वादाच्या बाबतीत तटस्थता विरुद्ध तादात्म्य, निर्मितीच्या प्रश्नात स्फूर्ती विरुद्ध अभ्यास अशा परस्परविरुद्ध भूमिका उत्स्फूर्त प्रतिक्रियांमधून व्यक्त होत असतात. ज्यावेळी आपण सौंदयं, कला इ० कल्पना द्विध्रुवात्मक आहेत असे म्हणतो त्यावेळी आपणाला परस्परविरोधी असणा-या भूमिकांचा कोणत्या तरी एका रुवाशी अपरिहार्य अनबंध दाखवता आला पाहिजे.

 लौकिकतावादी भूमिका जीवनवादी असणे भाग आहे काय ? अलौकिकतावादी भूमिका कलावादी असणे भाग आहे काय ? या प्रश्नांची उत्तरे तात्त्विक पद्धतीने द्यावी लागतात. ती संख्या मोजून देता येत नाही. दहा जीवनवादी विचारवंत लौकिकतावादी आहेत असे सांगन हा प्रश्न सुटत नसतो. तर लौकिकतावादाला जीवनवादी असणे अपरिहार्य का आहे, असे सांगावे लागते. तसे पाहिले तर भाषाशास्त्र आणि व्याकरणाच्या अभ्यासाला जीवन व्यवहारात साक्षात उपयोगिता अशी कोणतीच नाही. माणसाच्या प्राथमिक अगर दुय्यम अशा कोणत्याही लौकिक गरजा भाषाशास्त्र व्याकरणाने पूर्ण होणार नाहीत. पण तरीही भाषाशास्त्र व्याकरण ह्यांचा अभ्यास आपण अकौकिक व्यवहाराचा भाग मानत नाही. उपयोगितेच्या कक्षेच्या बाहेर जाणारा व्यवहार हा जीवनव्यवहाराचाच भाग आहे. सुसंस्कृत मानवी जीवनात लौकिकवाद्यांच्या समोरसुद्धा उपयोगिता हे एकच मूल्य नसते. अशा अवस्थेत लौकिकतावाद्यांना जीवनवादी असणे भाग नाही. आणि जे अलौकिकतावादाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्यापैकी अनेकजण अलौकिक हा शब्द आध्यात्मिक अर्थाने वापरीत आहेत. मोक्ष ही जीवनाची इतिकर्तव्यता मानणारे लोक कलांचा अनुभव

१०२

ओळख