पान:ओळख (Olakh).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असली तरी ही जीवनवादी समीक्षेची भूमिका असू शकत नाही. जीवनवादी समीक्षेला जीवनव्यवहाराच्या संदर्भात कलांचे महत्त्व व मोठेपण उलगडून दाखवता आले पाहिजे. कलाकृतीचे आकलन व मूल्यमापन करता आले पाहिजे. कलांचा व्यवहार जीवनातून निपटून बाजूला काढण्याची आकांक्षा धरणारे लोक केवढेही मोठे असोत, त्यांना खऱ्या अर्थाने जीवनवादी कलासमीक्षक म्हणता येणार नाही. पुन्हा एकदा या संदर्भात कोणत्या भूमिका जीवनवादी आहेत हेच तपासून घ्यावे लागेल. जीवनवादी समीक्षेसमोरचा मूलभूत प्रश्न कलावंताचे मन आणि कलाकृती, भोवतालचा समाज आणि कलाकृती यांचा संदर्भ उलगडून दाखविणे हा असू शकत नाही. शंभर विचारवंतांनी जरी हा प्रयत्न केला तरी तो आनषंगिक प्रश्न आहे. मुख्य प्रश्न कलात्मक व्यवहाराचे स्वरूप सांगण्याचा, मानवी जीवनात जे महत्त्व आणि मोठेपण आपण ह्या व्यवहाराचे सांगणार ते जीवनाच्या संदर्भात सांगण्याचा आहे.
 सौदर्याची जाणीव मानवी समाजात निर्माण होते कधी ? हा पहिला प्रश्न आणि मानवी जीवनात या जाणिवेचे महत्त्व काय हा दुसरा प्रश्न. या दोन्ही प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कलामीमांसा करण्यात अर्थ नसतो. नेमक्या या दोन प्रश्नांची उत्तरे पाटणकांच्या मीमांसेत आढळत नाहीत. पाटणकरांचे विवेचन दोन प्रमुख कल्पनांवर आधारलेले आहे. त्यातली एक कल्पना कुलसाम्याची आहे. दुसरी कल्पना म्हणजे पाटणकरांचा द्विरुवात्मकतेचा सिद्धांत आहे. या दोन्ही कल्पनांचा विचार वर उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या संदर्भात होणे आवश्यक आहे.

 कलात्मक व्यवहाराचा विचार कुलसाम्याच्या कल्पनेच्या आधारे करणे यात काही सोयी आहेत. त्याप्रमाणेच या मार्गाने विवेचन करताना काही धोके आहेत. त्यातील सोयीचा विचार चटकन लक्षात येतो; धोके तितक्या लौकर जाणवत नाहीत. कलात्मक व्यवहारात आपला संबंध कलाकृतीशी असतो. एका कलाप्रकारातील कलाकृतीमध्ये फार मोठी विविधता असते. वाङमयापुरताच विचार करावयाचा तर एखादा दोहा किंवा एखादा सुभाषितवजा श्लोक, कधी संपूर्ण कलाकृती समजावी लागते. त्याउलट सगळे महाभारतही मिळूनसुद्धा एक कलाकृतीच असते. एका कलाप्रकारात नानाविध प्रकारची विविधता आढळते. मग विविध कलाप्रकारांत मिळून आढळणारी विविधता तर विस्मयकारकच म्हणावी लागेल. कलाकृतींच्या या वर्गात प्रत्येक महत्त्वपूर्ण कलाकृती आपल्या वेगळेपणाने उमटून दिसत असते. अशावेळी सर्व कलाकृतींची विविधता लक्षात घेऊन एखादी व्याख्या करणे कठीणच होते. सर्व कलाप्रकारांतील सर्व कलाकृतींना लाग पडणारा असा एक समानधर्म सांगणे जवळजवळ अशक्य होते. पाटणकर याला सत्त्व म्हणतात.

ओळख

९९