पान:ओळख (Olakh).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उभे करते याचा विचार बहुतेक वेळेला समीक्षकांनी केलेला नसतो. जर आपण प्रत्येकच कलाकृती अपरिहार्यतः अनन्यसाधारण आहे असे मानले तर मग सगळ्याच कलाकृती अनन्यसाधारण असल्यामुळे कलाकृतीचा दर्जा आणि यश ठरविण्यासाठी हे सूत्र निरुपयोगी होते. जो धर्म सार्वत्रिक आहे, त्या धर्माला मूल्यमापनाची कसोटी मानता येत नाही. दुसरे म्हणजे, जर प्रत्येक कलाकृती अनन्यसाधारणच असेल आणि इतर कलाकृतींशी तिचे कोणतेच साम्य नसेल तर मग कलाकृतींचा वर्गच निष्पन्न होणार नाही. आणि मग कोणती कलाकृती, कलाकृती म्हणून ओळखता येणार नाही. शेवटची गोष्ट म्हणजे, प्रत्येक कलाकृतीच्या ठिकाणी एक व्यक्तिवैशिष्ट्य असते हे मानल्यामळे कलाकृतींमध्ये काही साम्यही असते हे अमान्य करावे लागत नाही. यामुळेच साधारणत्व आणि अनन्यसाधारणत्व या दोन कल्पना एकत्रित असू शकतात. त्या परस्परांशी विसंगत आहेत असे समजण्याचे कारण नाही. त्या परस्पर भिन्न आहेत इतकेच.

 पाटणकरांच्या विवेचनात असे अनेक मामिक मुद्दे विखुरलेले आहेत. त्यांनी केलेली कलावाद्याची आणि जीवनवाद्याची तपासणी यांच्यातील बारकावा नोंदवीत बसण्याचे काम पुष्कळच लांबणारे आहे. काही मुद्यांवर मतभेदही दाखवता येण्याजोगे आहेत. पण त्या सगळ्या विवेचनाकडे जाण्याऐवजी त्यांच्या मीमांसेला मूलभूत ठरणारे काही प्रश्न विचारात घेऊन हे परीक्षण थांबविले पाहिजे. यातील एक प्रश्न असा आहे की, आजवर अलौकिकतावादी आणि कलावादी मीमांसकांनी कोणते प्रश्न उपस्थित केले त्यांचीच तपासणी पाटणकर करतात. एक निर्दोप अलौकिकतावादी भूमिका जर मांडायची असेल तर तिला कोणत्या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील याकडे पाटणकरांनी फारसे लक्ष दिलेले नाही. हाच मुद्दा सर्व लौकिकतावाद्यांना लागू आहे. लौकिकतावाद्यांनी आणि जीवनवाद्यांनी आपली भूमिका आजवर अशी मांडली आहे इतकेच पाहन चालणार नाही; तर जीवनवाद्यांना कोणती भूमिका घेणे भाग आहे याचाही विचार करावा लागेल. कारण कलांचा व्यवहार हा असा व्यवहार आहे की जिथे कोणता विचारवंत कोणती भूमिका घेईल ह्याचा नेम नाही; हे सर्व कवी खोटारडे आहेत, असत्य मांडतात, असत्याला प्रतिष्ठा देतात म्हणन हे सभ्य वस्तीतून हद्दपार केले पाहिजेत अशी एक भूमिका आहे. ही भूमिका थोडीफार दुरुस्त करून, प्लेटोच मानतो असे नाही. प्राचीन भारतातही ही भमिका घेणारे लोक होते याची नोंद मल्लीनाथाने केलेली आहे. ही भूमिका ग्राह्य समजावी की अग्राह्य समजावी हा अगदी निराळा मुद्दा आहे; पण ही जीवनवादी कलासमीक्षेची भूमिका असू शकते काय ? कितीही जणांनी कितीही वेळा घेतलेली

९८

ओळख