पान:ओळख (Olakh).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गौरवबद्धीने भारावलेले असतात. या मंडळींना आपण जे लिहितो आहोत त्यातील सूक्ष्म विसंगतीचे भान असण्याचा संभव फार कमी असतो. संस्कृत साहित्यशास्त्रात सुद्धा वेगवेगळ्या भूमिका आहेत. या भूमिकांचे वेगळेपण तत्त्वज्ञानातील भेद हे तर असतेच, पण वाङमयाकडे पाहण्याच्या भूमिकेतील भेद हेही असते. आणि म्हणून संस्कृत काव्यशास्त्रातील कोणत्याही प्रमुख भूमिकेचे निर्विवाद असे खंडन होण्याचा संभव नाही. लोल्लट कधी संपूर्णपणे बाधित होणारा पक्ष नसतो. किंवा अभिनवगुप्तसुद्धा निरपवादपणे मान्य करता येईल असा विवेचक नसतो. अमुक एक उथळ, अमुक एक परिपूर्ण ही भूमिका व अंतिमत: सत्यसिद्धांत या गोष्टी जाणवण्याचा संभव फार कमी आहे. म्हणून पाटणकरांसारखा अभ्यासक याही क्षेत्राकडे अधनमधन वळणे संस्कृत साहित्यशास्त्राच्या अभ्यासाला उपयोगी ठरणारे आहे. शतकानुशतके संस्कृत साहित्यशास्त्राचे समर्थक असे समजत आले की भट्टतौताने केलेले शंकुकाचे खंडन हे विनतोड आहे. अतिशय मार्मिकपणे पाटणकरांनी हे दाखवून दिले आहे की तौताच्या खंडनापेक्षा शंकुकाची मांडणी हीच सत्याला जास्त जवळ आहे. अभिनवगुप्ताच्या विवेचनामुळे संस्कृतसाहित्यशास्त्रातील रसव्यवस्था परिपूर्ण झाली असे परंपरागत अभ्यासक गृहीत धरूनच चालतात. पण अभिनवगुप्ताच्या विवेचनात एकीकडे काव्यामुळे जागृत होणारे भाव लौकिक नसून अलौकिक आहेत म्हणून काव्यानुभव अलौकिक आहेत अशी मांडणी आहे. दुसरीकडे स्थायीभावांची कल्पना सर्व व्यक्तींच्या ठिकाणी जन्मजात असणान्या पुरुषार्थांना उपयोगी पडणान्या स्थिर भावनांच्या आधारे स्वीकारली पाहिजे अशी लौकिकतावादी मांडणी आहे. लौकिकवाद आणि अलौकिकवाद यांच्या परस्परांना छेद देणाऱ्या भूमिका अभिनवगुप्ताच्या मीमांसेत सारख्याच आग्रहाने कशा मांडल्या जातात याकडे पाटणकरांच्या विवेचनामुळे पाहणे सोपे जाईल.

 साधारणीकरणाच्या मुद्यावर मात्र थोडाफार मतभेद होण्याचा संभव आहे. एखादी भावना देश, काल आणि व्यक्ती यांच्या संदर्भापासून मोकळी झाली म्हणजे त्या भावनेचे साधारणीकरण होते हे ह्या कल्पनेचे फार स्थूल स्पष्टीकरण झाले. भट्टनायक ज्यावेळी साधारणीकरणाची कल्पना मांडतो त्यावेळी निजत्व मोह हा रसिकांसाठी त्याने संकटस्वरूप मानलेला आहे. वाङमयाच्या आस्वादात किंवा कलांच्या आस्वादात निजत्वाचा निरास होतो हे वाङमयीन अनुभव आनंदस्वरूप असण्याचे कारण आहे. भारतीय दर्शनात कोणत्याही व्यक्तीला सुखदुःख जाणवणे निजत्वाच्या अवस्थेतच शक्य मानलेले आहे. निजत्व संपल्यानंतर येणारा अनुभव सुखदुःख अभावरूप असा तरी असतो किंवा वेदांत्याच्या परंपरेत आनंद हे आत्म्याचे स्वस्वरूप असल्यामुळे निजत्व संपल्या

ओळख

९५