पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामाजिक न्यायाचे प्रश्न व समस्या भारतातील सामाजिक न्यायाचे प्रश्न व समस्या व्यापक आहेत. सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न आहे तो सर्व वंचितांना समान संधी व दर्जा देण्याचा. सामाजिक न्यायाचे वाटप जात व धर्मनिरपेक्ष असायला हवे. भारतासारख्या खंडप्राय देशात भाषा, लिंग, वंश, राजकीय प्रणाली, प्रदेश यापलीकडे जाऊन आर्थिक निकषांच्या आधारे आपण जोवर सामाजिक न्यायाची उभारणी व रचना करणार नाही तोवर आपणास संधी व दर्जाचे समानत्व साध्य करता येणार नाही. त्यासाठी सर्व दुर्बल घटकांना समाजाच्या मध्य प्रवाहात आणण्याचे सर्वसमावेशक धोरण स्वीकारावे लागेल. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे प्रश्न म्हणजे मानवाधिकारांचे प्रश्न होय. निवास, वीज, पाणी, प्रसाधन सुविधा, रस्ते, राहणीमान, शिक्षण, आरोग्य, शिधावाटप इत्यादी क्षेत्रांत आपण सतत काही करत आलो तरी या वर्गाच्या संख्या व स्थितीवर नियंत्रण करता आलेले नाही. जातिभेद, लिंगभेद, प्रांतभेद, भाषाभेद मिटवून एकसंघ राष्ट्र उभारणीच्या दिशेने आपण ज्या राष्ट्रीय प्रेरणेने अग्रेसर व्हायला हवे होते, त्यात राजकीय स्वार्थामुळे प्रत्येक वेळी अडथळे उभारल्याचे चित्र आहे. ईशान्य भारत असो, तेलंगणा असो वा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद-प्रांतापेक्षा राष्ट्र प्रथमचा विचार आपण रुजवू शकलो नाही. प्रादेशिक पक्षांची वाढ हा आपल्या प्रादेशिक संकीर्णतेचाच पुरावा होय. शिक्षणाचा प्राथमिक अधिकार, मोफत व सक्तीचे शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे आपले आजवरचे दुर्लक्ष हे सामाजिक असंतुलन व विषमतेचे कारण होय. ग्रामीण भागापेक्षा नागरीकरण, कृषीपेक्षा उद्योग प्राधान्य, सदोष परराष्ट्र धोरणामुळे संरक्षणावरील वाढता खर्च या सर्वांमुळे विकास कार्यापेक्षा प्रतिबंधात्मक बाबींवर आपणास मोठा खर्च करावा लागतो. लोकप्रतिनिधी, प्रशासन शासन (सरकार) यांवर होणारा खर्च सरंजामीच होय. यामुळे वंचित घटकांना त्यांच्या विकासाचा अपेक्षित वाटा मिळाला नाही. परिणामी, त्यांच्या प्रश्न व समस्यांचे स्वरूप दिवसागणिक गंभीर होत आहे. वाढती बेरोजगारी, लिंगभेद दरी, आर्थिक विषमता यामुळे व नव्या जागतिकीकरणामुळे वंचित वर्गाचे जीव अस्तित्वच धोक्यात आल्यासारखी स्थिती आहे. वंचित विकासाचा विचार ही फार पुढची गोष्ट ठरते. वंचित बालकांची दुःस्थिती समाजात अनाथ, अनौरस, निराधार मुलांची संख्या आपणास नियंत्रित वा कमी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या संगोपन, शिक्षण, पुनर्वसनाची वंचित विकास जग आणि आपण/४४