पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

प्रस्तावना

मुलींची कमी होणारी संख्या हा राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. सोनोग्राफी मशिनचा, जनुकिय तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन प्रसूतीपूर्व आणि गर्भधारणापूर्व गर्भलिंग निदान करुन बेकायदेशीर गर्भपात करण्याचे प्रकार वाढल्याने मुलींची संख्या भयावहरित्या घटली आहे. म्हणूनच गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे.
 भारत सरकारलाही 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा राष्ट्रीय कार्यक्रम हाती घ्यावा लागला. महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या राष्ट्रीय कार्यक्रमात समाविष्ट अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, जळगाव, बुलढाणा, उस्मानाबाद, वाशिम, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण पोषण आहार स्वच्छता समितीच्या सदस्यांना प्रशिक्षित करुन गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित करण्यात आले. लेक लाडकी अभियानाच्या पुढाकाराने राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयाने आणि संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी यांच्या आर्थिक सहका-याने प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
  या प्रशिक्षणादरम्यान आणि प्रशिक्षणानंतर जिल्हाधिका-यांपासून ते आशा, अंगणवाडी ताई पर्यंत, धार्मिक सण समारंभापासून ते ग्रामसभांपर्यंत लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात यश आले. त्या त्या ठिकाणी सक्षमपणे ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या. सरपंचांचा सहभाग घेण्यात आला. घडलेल्या अनेक घटना, कार्यक्रम आणि व्यक्ती यांच्या माध्यमातून समतेच्या दिशेने टप्याटप्याने घडत असलेले हे बदल इतिहासाच्या पटलावर या पुस्तकाच्या माध्यमातून नोंदवण्याचा हा छोटासा पण महत्वपूर्ण प्रयत्न आम्ही करीत आहोत. वाचकांच्या ते पसंतीस उतरेल, त्यातून लेक लाडकी अभियानाचे बळ वाढेल, हा विश्वास आहेच.

अॅड. वर्षा देशपांडे प्रवर्तक,

लेक लाडकी अभियान