पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देण्याचे, त्यांच्यावरील अत्याचारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन भविष्यकाळात मानव अधिकारासंबंधी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या धर्तीवर केवळ मानव अधिकार रक्षणार्थ आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थापण्याचाही विचार जागतिक पातळीवर गंभीरपणे करण्यात येतो आहे. जगभर जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे लोकांचे स्थानांतर (Migration) वाढते आहे. त्यातून नवे सांस्कृतिक प्रश्न उभे रहात आहेत. भविष्यकाळात त्यावरही प्राधान्याने विचार होणार आहे. हे स्थानांतर अनेक कारणांनी होते. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, राजकीय उलथापालथी इ. मुळे हजारो लोकांचे स्थलांतर हा जागतिक प्रश्न झाला आहे. अफगाणिस्थान, लिबिया, सिरिया, इराक इ. देशांची अलीकडची उदाहरणे या संदर्भात लक्षात घेणे आवश्यक आहे. विशेषतः युद्ध, आक्रमण, दहशतवाद इ.मुळे अनेक देशात निर्नायकी अवस्थेमुळे शासनच उरलेले नाही. परिणामी, त्या देशांत अनियंत्रित राजकीय परिस्थिती निर्माण होऊन शासकीय व्यवस्थाच विसर्जित होते. अशी अराजक स्थिती (Statelessness) हा विश्व समुदायापुढचा नवा बिकट प्रश्न बनतो आहे. जगातील वाढत्या विषमतेमुळे अविकसित देशात, विशेषतः आशिया व आफ्रिका खंडात आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. समृद्ध देशातही वाढत्या दिवाळखोरीमुळे तेथील सामाजिक सुरक्षायोजना धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे आरोग्य, जीवनमानच संकटात येईल की काय अशी भीती अर्थतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. हवामानातील बदलामुळे निसर्ग अस्थिर बनून त्सुनामी, ग्लोबल वॉर्मिंग, जमीन विघटन इ. प्रश्न ऐरणीवर आल्याने देशच्या देश संकटग्रस्त होतात. अलीकडे जपान, अमेरिकेत आलेली वादळे, थायलंडचा पूर या संदर्भात लक्षात घ्यायला हवा.

 मानवी जीवन अधिक सन्मान व प्रतिष्ठेचे व्हावे म्हणून भविष्यकाळात जात, धर्म, पंथ, परंपरा, चालीरीती, लिंग, आर्थिक स्थिती इ. चा विचार न करता केवळ ‘मनुष्य' म्हणून सर्वांकडे पाहण्याचा विचार विश्वस्तरावर रुजवला जाणार आहे. त्यामुळे भेदरहित समतायुक्त मनुष्यसमाज निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. पारंपरिक प्रतिष्ठेपेक्षा जन्मगत मनुष्य' या एकाच न्यायावर सर्वांचे मूल्यमापन केले जावे असा प्रयत्न राहणार आहे. आज समाजात स्थलांतरित श्रमिक, वृद्ध, आदिवासी, कोळी इ. उपेक्षित वर्गाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून ते मानव अधिकारांनाच पारखे होत आहेत. याची गंभीर नोंद घेऊन त्यांच्या अधिकाररक्षणाचे विशेष प्रयत्न हे एकविसाव्या शतकापुढचे आव्हान आहे.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/९८