पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुरक्षा योजना, सामाजिक विमा योजनेतून साह्य मिळणे आवश्यक आहे. (स्वातंत्र्याचा हीरकमहोत्सव झाला, तरी याचा आपण साधा विचारही केला नाही.) अशा मुलांचे लैंगिक शोषण होणार नाही व त्यांचा गैरकृत्यासाठी वापर होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

भावसाक्षरता वाढायला हवी



 खरे तर बालकांच्या भल्याच्या या सर्व गोष्टींबद्दल सर्वसामान्य नागरिकारत भावसाक्षरता वाढवणे, अशा मुलांचा सांभाळ करण्याबाबत प्रत्येक कुटुंबात भावजागर घडवून आणण्यासाठीच ‘राष्ट्रीय दत्तक सप्ताह' आहे. आपले बाळ असतेच, परंतु परक्यास आपले करण्याची उदारता येणे म्हणजे सामाजिक होणे. तुम्हाला बाळच नसेल तर एक का अनेक बाळे तुम्ही दत्तक घेऊ शकता. मी युरोपमधील दत्तक मुलांचा अभ्यास करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा एक कुटुंब पाहिले. सतरा मुले त्यांनी दत्तक घेतली होती. तीही वेगवेगळ्या देशांतील. मी त्यांना विचारले, “इतकी मूले का दत्तक घेतलीत?" त्यांचे उत्तर होते, “यांना त्यांच्या देशात कोणीही दत्तक घेत नव्हते." ती सर्व मुले काळी, कुरूप, पांगळी होती व त्या कुटुंबात सुखी होती. मी त्यांना विचारले, “पुढे या मुलांचे काय?" तर ‘‘ती आमच्यासारखी आणखी मुलांना दत्तक घेतील, असे पाहणार." हे त्यांचे उत्तर होते. ते ऐकल्यानंतर मला माझ्या सामाजिक काळ्या मनाची कीव आली. तुम्हाला?

 दत्तक कार्याच्या आजवरच्या या सगळ्या प्रवासात माझ्या लक्षात आले की अनाथ, नैसर्गिक आपत्तिग्रस्त, हरवलेली, एड्सग्रस्त, भंगलेल्या कुटुंबातील, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासींची मुले-मुली तुमच्या मुलांसारखीच रक्तामांसाची असतात. घरातल्या मुलांना विकार होतात, असतात तसे यांनाही. फक्त त्यांना पालक नसतात. तुम्ही त्यांचे पालक होऊ शकता. तीस वर्षांपूर्वीचा समाज नि आताचा... किती फरक झालाय म्हणून सांगू? १९८० च्या दरम्यान मुले होती, दत्तक घेणारे पालक नव्हते. आज दत्तक पालक मुलांची प्रतीक्षा करत तिष्ठत उभे आहेत. हे सारे चित्र दत्तक क्षेत्रात कार्य करणाच्या संस्था, कार्यकर्त्यांनी निर्माण केले, याचा मला मोठा आनंद व अभिमान आहे. आपण ‘देवकी' नाही; पण 'यशोदा'तरी बनू शकतो, या पालकांच्या सकारात्मकतेतून हे चित्र उभे राहिले. पूर्वी मुली दत्तक जायच्या नाहीत. आम्ही गावोगावी बाजारात, जत्रेत जाऊन प्रचार करायचो. अशा किती तरी प्रयत्नांतून मुलींचा विजनवास संपला.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/९३