पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कर्या सुधारकाचा आदर्श वस्तुपाठ ठेवला. पुढे पंडिता रमाबाईंनी 'शारदाश्रम' (१८९६), भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे (पुणे) येथे ‘बालिकाश्रम', प्रार्थना समाज, मुंबईने पंढरपूर येथे सन १८७५ मध्ये ‘बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केले. संस्थेतील अनाथ मुले-मुली अपत्यहीन दांपत्यांना दत्तक देण्याची परंपराही या संस्थांनीच सुरू केली.
 या कार्यास वैधानिकता देण्यासाठी व तिच्यात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने 'हिंदू दत्तक व पोटगी कायदा' सन १९५६ मध्ये अस्तित्वात आला. हिंदूंव्यतिरिक्त अन्य धर्मीयांसाठी (ख्रिश्चन, मुस्लीम इत्यादी) १८९० पासून अस्तित्वात असलेल्या कायद्याने दत्तक विधान होत आले आहे. १९६० नंतरच्या काळात भारतीय संस्थांतील मुले विदेशात दत्तक देणे सुरू झाले. त्यास आलेल्या व्यावसायिक रूपाची नोंद घेऊन सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश जारी केले. त्यातून अवैध मार्गांनी दत्तक देण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आले. समान नागरी कायद्याच्या धर्तीवरील सर्वंकष अशा दत्तक कायद्याची मागणी १९९५ पासून पडून आहे. आज ‘बालन्याय अधिनियम-२०००' अन्वये दत्तक प्रक्रिया होते आहे.
काय आहेत बालकांचे हक्क?

 या सर्व पार्श्वभूमीवर आपण जेव्हा ‘राष्ट्रीय दत्तक सप्ताह' साजरा करतो, तेव्हा त्यामागे कोणत्या लोकप्रबोधनाची गरज अधोरेखित होते? आज बालकांचे शिक्षण, आरोग्य, संगोपन, पुनर्वसन, मृत्युदर, आहार, हक्क, मानवाधिकार असे अष्टावधानी प्रश्न आहेत. दत्तकासंदर्भात आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जगभर बालकांचे काही हक्क मान्य करण्यात आले आहेत. त्यानुसार जन्मलेल्या प्रत्येक मुलास जगण्याचा हक्क आहे. त्याला नाव, राष्ट्रीयत्व असण्याचा व आई-वडील नसल्यास सांभाळ करून घेण्याचा अधिकार आहे. मुलांना बेकायदेशीरपणे विदेशात पाठवता येणार नाही; तसेच आणताही येणार नाही. जे मूल कुटुंबाला वा पालकांना पारखे झाले आहे, त्याला संरक्षण व साह्य मिळवण्याचा हक्क आहे आणि तो देणे शासन व समाजाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रतिपालक आई-वडील (F$oster Parents), इस्लामिक कायद्यानुसार काफिला (संरक्षण व सांभाळ करणारी जमात, व्यवस्था), दत्तक पालक शोधावेत. असे करताना शक्य तो त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी जपावी. दत्तक देताना शक्यतो देशातच दत्तक द्यावे. या सर्वांत मुले विकली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. असे संरक्षण व साह्य मिळवण्याचा अधिकार अंध, अपंग, मतिमंद बालकांना पण आहे. अशा मुलांना सामाजिक

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/९२