पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
एक पाऊल दुस-यासाठी!



 आपण विविध सप्ताह किंवा दिन साजरे का करतो? उत्तर सोपे आहे, त्या त्या गोष्टीविषयी समाजमन जागृत व्हावे म्हणून; तसेच राष्ट्रीय दत्तक सप्ताह साजरा करण्यामागे दत्तक प्रश्नाविषयी समाजमन संवेदनशील व क्रियात्मक करण्याचा उद्देश आहे.
 आजच्या काळाकडे वळण्याआधी आपण जरा मागे पाहया. इतिहासाकडे नजर टाकली की वर्तमान समजून घेण्यास सोपा जातो! आपल्याकडे दत्तक विधानाची समस्या प्रारंभापासूनच आहे. प्राचीन वाङ्मयात पुत्रकामेष्टी यज्ञ, कुमारसंभवाचे उल्लेख सापडतात; तसेच ‘दत्तक मीमांसा,' ‘दत्तक सिद्धांत मंजिरी,' ‘दत्तक चंद्रिका'सारखे ग्रंथही आढळतात. भारतीय समाज प्रारंभापासून पितृसत्ताक राहिल्याने वंशसातत्य, संपत्ती वारस, मोक्ष इत्यादीसाठी पुत्रप्राप्ती आवश्यक मानण्यात येत होती. पूर्वी नात्यागोत्यातील मुलेच दत्तक घेतली जात; पण पुढे नागरीकरण, औद्योगिकीकरण इत्यादींमुळे समाज पुढारला व कुटुंबाबाहेरील मुले दत्तक घेणे सुरू झाले.

 भारतभर अनाथ, निराधार मुला-मुलींचा सांभाळ करणाच्या संस्थांची परंपरा एकोणिसाव्या शतकापासून दिसून येते. दत्तकासंदर्भातील कार्याचा प्रारंभ ख्रिस्ती मिशनच्यांनी केला. त्यांचे अनुकरण करत महात्मा फुले यांनी कुमारी माता व त्यांची मुले यांचा सांभाळ व संरक्षण करण्याच्या हेतूने सन १८६३ मध्ये ‘बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केले. संस्थेच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल, की पूर्वी अनैतिक (?) संबंधातून जन्मलेली अनौरस (?) अर्भके मोठ्या प्रमाणात अनास्था, दुर्लक्ष, उपेक्षेमुळे मृत्युमुखी पडायची. स्वतः महात्मा फुले यांनी संस्थेतील बाळ (यशवंत) दत्तक घेऊन महाराष्ट्रापुढे

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/९१