पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हे नि असे अनेक सामाजिक बदल महाराष्ट्रात सर्वत्र दिसत आहेत. २०१० साली महाराष्ट्र आपल्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राचे बदल, परिवर्तन हे केवळ बाह्य दर्शनाच्या, प्रदर्शनाच्या पातळीवर होऊ नयेत. महाराष्ट्रास प्रबोधनाची मोठी परंपरा आहे, तशीच समाजकार्याची पण. असे असले, तरी गेल्या ४८ वर्षांत महाराष्ट्रीय समाजाची आत्मकेंद्रितता पूर्वी कधी नव्हती इतकी वाढली आहे. आपले सामाजिक बदल दृष्यरूपात पाहून चालणार नाही. अंतर्विकासकेंद्री विचारपद्धती रुजवणारे प. बंगाल, केरळसारखे प्रांत आपल्यापुढे आदर्श म्हणून हवेत. बिहारी, उत्तर प्रातीयांची कष्टाळू वृत्ती, कुठेही जाऊन व्यवसाय करायची मानसिकता, गुजराती, मारवाड्यांची नि सिंधींची व्यावसायिक चिकाटी महाराष्ट्रीय शिकणार नाहीत, तोवर केवळ नोकरीवरच त्याला अवलंबून राहावे लागणार. नवं जग व्यवसायकेंद्री आहे. रोजगाराच्या संधी वाढत्या यंत्र क्रांती व संपर्क क्रांतीने कमी होणार आहेत. त्यामुळे ‘सावध ऐका पुढच्या हाका?', 'कायदा पाळा गतीचा?', ‘मळ्यास माझ्या कुंपण असणे, कधी न मला हे साहे?' अशी मानसिक, सामाजिक, राजकीय उदार विचारसरणी आत्मसात केली तरच बदलत्या काळात आपणास काही भविष्य आहे. केवळ भावनिक मुद्यांवर भडकाऊ वक्तव्यांच्या आधारे महाराष्ट्र बदलता येणार नाही. महाराष्ट्र खरा बदलायचा असेल तर अर्थबळ वाढवणे, रोजगार संधी विकसित करणे, शेतीस अभय देणे, सिंचन क्षेत्र वाढवणे, या बाबींकडे लक्ष केंद्रित केले तरच महाराष्ट्रास भविष्य आहे. इतिहासातील चुका दुरुस्त करणारी राज्येच पुढे जाऊ शकतात हे आपल्या शेजारच्या गुजरात व आंध्रप्रदेशाने आपणास त्यांच्या विकासाने दाखवले आहे.

■■







एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/९०