पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्वातंत्र्याच्या गेल्या साठ वर्षांच्या प्रवासात आपला देश राजकारणकेंद्रित झाला. तो समाजकारणकेंद्रित करणं हे नव्या समताधिष्ठित समाजरचनेपुढचं महत्त्वाचं आव्हान आहे. त्यासाठी लोकमानसाची नवी घडण व्हायला हवी. निवडणुकांची पद्धती जितकी सदोष, तितकं मतदानही सदोष होतं. पैसे घेऊन मतदान केलं तर योग्य उमेदवार येत नाहीत. मग पाणी नाही, वीज नाही, गटारे तुंबलेली, शिक्षक शिकवत नाहीत अशा तक्रारींना फारसा अर्थ राहात नाही. लोकशाही हवी, पण ती भोंगळ नको. सहकार हवा; पण तो भ्रष्ट नको. संघटना हव्यात; पण त्यांनी कर्तव्याबद्दलची बांधिलकी स्वीकारायला हवी. आरक्षण हवं; पण त्यात लाभार्थीना प्राधान्य देण्याची यंत्रणा हवी.
 भारत हा बहुजातीय, धर्मीय, भाषीय देश जसा आहे, तसा तो बहुवर्गीयही आहे. गेल्या साठ वर्षांत समतेच्या निकषावर ज्या घटक व वर्गाकडे दुर्लक्ष झालं, ते आपले विकासकेंद्र झाले पाहिजे. लोकशाहीची विसंगत व्यवस्था दुरुस्त करणं हे नव्या समता संकल्पनेपुढचं आद्य कर्तव्य आहे.

■■








एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/८५