पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते मध्यप्रवाहात आले. अंधश्रद्धेचं आपण उच्चाटन जरी करू शकलो नाही, तरी विज्ञाननिष्ठा आपण जोपासली. सरंजामी व्यवस्थेजागी आपण लोकशाही मानसिकता निर्माण केली. आर्थिक दरी दूर करण्यासाठी आपण दारिद्रयरेषेखालील लोकांना विशेष सवलती बहाल केल्या. स्त्री-भ्रूणहत्येवर नियंत्रण आणले. कसेल त्याची जमीन होईल असं पाहिलं. सावकरी पाशास शह द्यायचा म्हणून आपण सहकारिता अंगिकारली. सक्तीच्या मोफत शिक्षणाद्वारे ज्ञानाचा दिवा घरोघरी लागेल, जागेल याची काळजी घेतली. निम्नवर्गास अधिक वेतनवाढ दिली नि त्याचे जीवनमान उंचावलं. या नि अशा कितीतरी कृतीतून आपण समतेचा संगर जागवला, रुजवला. आज जागतिकीकरणामुळे या सर्वांवर वरवंटा फिरणार की काय, म्हणून समाज त्रिज्येवर असलेला विकासशील वंचित समाज चिंतातुर झाला आहे.
 सामाजिक सहअस्तित्व व सहविचार हे नव्या शतकाच्या समाजबांधणीचं सूत्र होणं गरजेचं आहे. समाजवादी समाजरचनेपुढं आज खरं आव्हान आहे ते जबाबदार, विवेकी, कार्यतत्पर नागरिक घडवण्याचं. त्यासाठी शिक्षणव्यवस्थेचे मूल्यमापन व्हायला हवं. विकासाची कार्यपद्धती नव्यानं ठरवायला हवी. अद्याप ज्या वंचित वर्गास सामाजिक न्यायाचा लाभ होऊ शकला नाही, ते सामाजिक न्यायाच्या कार्यक्रमपत्रिकेत प्राधान्याने यायला हवेत. शासननिर्णयांची कसोटी जनकल्याण व देशविकास व्हायला हवी. खेडे अद्याप सुविधांपासून वंचित आहे. ते विकासाचे केंद्र व्हायला हवं. अनाथ, अपंग, अंध, शेतमजूर, अल्प भूधारक, निम्न मध्यमवर्ग, अशिक्षित स्त्रिया हे वंचितांचे लाभार्थी घटक विकासाचे गाभा घटक म्हणून निश्चित करणे आवश्यक आहे. समतेची नवी मांडणी करताना सामाजिक न्यायाच्या परीघाबाहेर राहिलेल्यांना विकासाच्या केंद्री आणणं आपलं लक्ष्य ठरणं गरजेचं आहे.

 समतेची संकल्पना केंद्रीय मानून विवेकी विकासनीती हे नव्या नियोजनाचं सूत्र व्हायला हवं. सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं आपण गेल्या शतकांत आरक्षणाचं धोरण स्वीकारलं. स्वातंत्र्याच्या गेल्या साठ वर्षांत जे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या विकासाच्या मध्यकेंद्री आले, उच्चशिक्षित झाले, उच्च उत्पन्न गटात आले, त्यांना प्राधान्य गटाच्या परीघाबाहेर काढून त्यांच्यापेक्षा अधिक गरजू असणाच्या वर्गांना त्या जागा, सवलती देण्याची सामाजिक न्याय पद्धती अंगिकारायला हवी. जातीय, धर्मीय आरक्षण निकष सुरक्षित ठेवून अद्याप ज्या वर्गांना याचा लाभ पोहोचला नाही अशा वर नमूद केलेल्या वंचित घटकांना नव्या नियोजनात

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/८३